चीनमध्ये जन्मली पहिली क्लोन मांजर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

चीनमधील सिंगोजीन कंपनीने पहिली क्लोन मांजर जन्माला घातली आहे. गार्लिक नावाच्या एका पाळीव मांजरीचा सात महिन्यापूर्वी मृत्यू झाला होता. याच गार्लिक मांजरीची क्लोन मांजर २१ जुलै रोजी चीनमध्ये जन्माला आली आहे. 

बीजिंग : चीनमधील सिंगोजीन कंपनीने पहिली क्लोन मांजर जन्माला घातली आहे. गार्लिक नावाच्या एका पाळीव मांजरीचा सात महिन्यापूर्वी मृत्यू झाला होता. याच गार्लिक मांजरीची क्लोन मांजर नुकतीच चीनमध्ये जन्माला आली आहे. 

महागडी प्रक्रिया
क्लोन तयार करण्याची प्रक्रिया खूप महागडी आहे. कुत्र्याच्या एका क्लोनसाठी ५३ हजार डॉलर्स म्हणजे ३८ लाख रुपये खर्च येतो. तर गार्लिक या मांजरीच्या क्लोनसाठी ३५ हजार डॉलर्स म्हणजे २५ लाख रुपये खर्च आला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, क्लोन बनविण्यासाठी खर्च मोठा असला तरी पाळीव प्राण्यांचे क्लोन बनविण्यासाठी मोठी मागणी आहे. त्यात तरुणांचा मोठ्या संख्येने समावेश आहे.  

आतापर्यंत ४० पाळीव कुत्र्यांचे क्लोनिंग
मांजरीचा क्लोन तयार करणारी सिंगोजीन ही चीनमधली पहिलीच कंपनी आहे. या कंपनीने आत्तापर्यंत ४० हुन अधिक पाळीव कुत्र्यांचे क्लोन तयार केले आहेत. बहुतेक ठिकाणी पाळीव प्राण्यांना घरातील सदस्य समजले जाते. चीन मधील युवा पिढीच्या भावनिक गरजा हे पाळीव प्राणी पूर्ण करतात.

मिळालेल्या माहितीनुसार, चीनमध्ये पाळीव प्राण्यांचा बाजार वाढत चालला असून, पेट फेअर एशियाच्या रिपोर्टनुसार चीनमध्ये पाळीव प्राण्यांवरील खर्च २३.७ अब्ज डॉलर्स म्हणजे १ लाख ७० हजार कोटींवर गेला आहे. जगातील बहुतेक देशांमध्ये प्राण्यांचे क्लोन करण्यास बंदी आहे. मात्र द. कोरिया आणि अमेरिकेत पूर्व परवानगीने प्राण्यांचे क्लोन बनविण्यास कोणताही बंदी नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The first clone cat born in China