पाक क्रिकेटपटू म्हणतोय, मी तलवारही चालवू शकतो

वृत्तसंस्था
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

सोशल मीडियावर रविवारी (ता.1) जावेद मियाँदादचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये त्याने काश्मीरविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये शाब्दिक युद्धास सुरूवात झाली असून दिवसेंदिवस यामध्ये वाढ होताना दिसतेय. कलम 370 हटविल्याने काश्मीरला धोका आहे, यामुळे जम्मू-काश्मीरचे महत्त्व संपुष्टात येऊ शकते, अशा वावड्या दररोज उठत असतात. 

आता पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूनेही या प्रकरणात उडी घेतली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांचीच री ओढत पाकच्या जावेद मियाँदाद या माजी क्रिकेटपटूने एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

सोशल मीडियावर रविवारी (ता.1) जावेद मियाँदादचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये त्याने काश्मीरविषयी वक्तव्य केले असून तो म्हणतो, 'काश्मिरी बंधूंनो, काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत. यापूर्वी मी फलंदाजी करताना षटकार ठोकत होतो, आता मी तलवार चालवणार आहे. जर मी मैदानात षटकार मारू शकतो, तर आता तलवार का नाही चालवू शकणार? मियाँदादच्या या वक्तव्यामुळे हिंसाचाराला उत्तेजना मिळत आहे. 

मियाँदाद हा पहिलाच पाकिस्तानी क्रिकेटपटू नाहीय. या अगोदर पाक क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीने काश्मीरबाबत पाकिस्तानच्या अजेंड्यावर ताशेरे ओढले होते. मात्र, हरप्रकारे प्रयत्न करूनही पाकिस्तानला जागतिक पातळीवर फारच कमी पाठिंबा मिळत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former Pakistan cricketer Javed Miandad makes controversial statement