शरीफ यांना दहा वर्षांचा तुरुंगवास

पीटीआय
शनिवार, 7 जुलै 2018

शरीफ यांना एक कोटी डॉलरचा, तर त्यांची कन्या मरियम हिला 26 लाख डॉलरचा दंडही ठोठावला आहे. शरीफ यांची कन्या मरियम हिला सात वर्षांची, तर जावई निवृत्त कॅप्टन सफदर यांना एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. 

इस्लामाबाद : "पनामा पेपर्स'प्रकरणी सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या तीनपैकी एका खटल्यात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आज ठोठावण्यात आली. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या भ्रष्टाचारविरोधी विशेष न्यायालयाने हा निर्णय दिला. शरीफ यांची कन्या आणि जावयालाही न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. 

लंडनमधील ऍव्हेनफिल्ड हाउसमधील चार सदनिकांची मालकी शरीफ कुटुंबीयांकडे आहे. या प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचे आरोप शरीफ आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणाचा निकाल चार वेळा पुढे ढकलण्यात आला होता. भ्रष्टाचारविरोधी विशेष न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आज निकाल जाहीर करताना 68 वर्षीय शरीफ यांना दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.

तसेच, शरीफ यांना एक कोटी डॉलरचा, तर त्यांची कन्या मरियम हिला 26 लाख डॉलरचा दंडही ठोठावला आहे. शरीफ यांची कन्या मरियम हिला सात वर्षांची, तर जावई निवृत्त कॅप्टन सफदर यांना एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. 

शंभर पानी निकालपत्र 

विशेष न्यायालयाचे न्यायाधीश मोहम्मद बशिर यांनी सुमारे शंभर पानांच्या निकालपत्राचे आज वाचन केले. पाकिस्तानात 25 जुलै रोजी सार्वत्रिक व प्रांतिक निवडणुका होत असून, त्या पार्श्वभूमीवर हा निकाल जाहीर झाल्यामुळे त्याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. पत्नी कुलसूम यांच्यावर लंडनमध्ये कर्करोगाचे उपचार सुरू असून, त्यामुळे शरीफ हे सध्या लंडनमध्ये आहेत. 

पहिल्या खटल्यात शिक्षा 
- "पनामा पेपर्स'प्रकरणी शरीफ यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात तीन खटले सुरू आहेत 
- पहिल्या खटल्याचा आज निकाल जाहीर करण्यात आला 
- नवाज शरीफ, त्यांची कन्या आणि जावयाला शिक्षा ठोठावली 
- शरीफ यांच्या मुलांना या पूर्वीच फरार घोषित करण्यात आले आहे 
- कुठलेही पद स्वीकारण्यास अपात्र ठरविल्यानंतर तीन वेळा पंतप्रधान राहिलेल्या शरीफ यांना पद सोडावे लागले होते 
- आगामी निवडणुकीच्या तोंडावर निकाल लागल्यामुळे शरीफ यांच्या अडचणी वाढणार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former Pakistan Prime Minister Nawaz Sharif gets 10 years imprisonment in corruption case