
अन्नसुरक्षेसाठी ‘जी-७’ पुढाकार
म्युनिक - रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे जगाची अन्नसुरक्षा धोक्यात आली असतानाच ‘जी-७’ या गटात सहभागी असलेल्या श्रीमंत देशांनी हे संकट दूर करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या आपत्तीच्या निवारणासाठी ४.५ अब्ज डॉलर एवढा निधी खर्च केला जाणार आहे. या युद्धामुळे जगातील अन्नधान्याचे संकट अधिक गहिरे झाले असून त्यांच्या किमतीही गगनाला भिडू लागल्या आहेत.
अमेरिकेच्या व्हाइट हाऊसकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, ‘‘ अमेरिका यासाठी २.६७ अब्ज डॉलरचा निधी राखून ठेवणार आहे. जगातील ४७ देशांना या माध्यमातून मदत केली जाणार असून काही प्रादेशिक संघटनांना देखील हा निधी देण्यात येईल. युद्धामुळे निर्माण झालेली अन्न असुरक्षा आणि कुपोषण या समस्यांचा त्याद्वारे सामना करण्यात येईल.’’
रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन हे कृषी उत्पादनाचा वापर शस्त्रांसारखा करत असल्याचे या गटाने म्हटले आहे. रशियाचे युक्रेनवरील जीवघेणे हल्ले सुरूच असताना ‘जी-७’ देशांच्या संघटनेने आज अन्न सुरक्षेवरील रशियन हल्ल्याचा निषेध करताना यामुळे जागतिक अन्न संकट अधिक गंभीर होईल, असा इशारा दिला आहे.
या हल्ल्यामुळे जगभरातील ३२३ दशलक्ष लोकांची अन्न सुरक्षा धोक्यात येईल अशी भीतीही या संघटनेकडून व्यक्त करण्यात आली. रशियाने काळ्या समुद्रातील बंदरावर अन्नधान्याचा साठा अडवून ठेवला असून तो तातडीने मोकळा करावा अशी मागणी या देशांकडून करण्यात आली. रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनमधील अन्नधान्याच्या उत्पादनावर परिणाम झाला असून निर्यातीला त्याचा जबर फटका बसला आहे.
ज्या देशांकडे अन्नधान्याचा मोठ्याप्रमाणावर साठा आहे त्यांनी तो खराब न होऊ देता तातडीने बाजारामध्ये खुला करावा, असे आवाहन या संघटनेकडून करण्यात आले आहे. जागतिक अन्नसुरक्षा अधिक भक्कम करण्यासाठी ‘जी-७’ च्या देशांनी ५ अब्ज डॉलरचा निधी देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे म्हटले आहे. युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणामुळे विकसनशील देशांसमोर भुकेचे मोठे संकट उभे राहिल्याने ‘जी-७’ कडून चिंता व्यक्त करण्यात आली. आजचा या संमेलनाचा शेवटचा दिवस होता. आज दिवसभर या संमेलनात जगभरातील अन्नसुरक्षेबाबत विचारमंथन करण्यात आले.
पंतप्रधान मोदी ‘यूएई’त दाखल
जर्मनीतील ‘जी-७’ देशांच्या परिषदेला उपस्थित राहिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संयुक्त अरब अमिरातीत (यूएई) दाखल झाले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘‘ पंतप्रधानांचा जर्मनी दौरा आज संपला. या दोन दिवसांच्या दौऱ्यामध्ये जागतिक आव्हानांबाबत अधिक सकारात्मक चर्चा झाली. दिल्लीमध्ये परतण्यापूर्वी मोदी हे काही काळ ‘यूएई’मध्ये थांबतील. अबुधाबीचे राजे शेख खलिफा बिन झायेद अल नहायान यांचे नुकतेच निधन झाले असल्याने त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी मोदी तिथे गेले आहेत. दोन दिवसांच्या जर्मनी दौऱ्यादरम्यान मोदी यांनी ब्रिटन, जपान, इटली आदी देशांच्या प्रमुखांशी विविध विषयांवर चर्चा केली होती.
बायडेन यांच्यावर रशियाची बंदी
‘जी-७’ मधील देश एकीकडे रशियाविरोधात एकवटले असतानाच रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन, त्यांची पत्नी आणि मुलगी यांच्यासह शेकडो नेत्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकले आहे, त्यांना आता रशियामध्ये येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. रशियाने आतापर्यंत अमेरिकेतील २५ नागरिकांवर बंदी घातली आहे.
Web Title: G 7 Initiative For Food Security
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..