esakal | जॉर्ज फ्लॉइडच्या कुटुंबियांशी बायडन यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट
sakal

बोलून बातमी शोधा

जॉर्ज फ्लॉइडच्या कुटुंबियांशी बायडन यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट

जॉर्ज फ्लॉइडच्या कुटुंबियांशी बायडन यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट

sakal_logo
By
विनायक होगाडे

वॉशिंग्टन : अमेरिकेतील वंशद्वेषाचा बळी ठरलेल्या जॉर्ज फ्लॉइड (George Floyd) या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या प्रथम स्मृतिदिनाला आज त्यांच्या कुटुंबीयांनी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन (US President Joe Biden) यांची ‘व्हाइट हाऊस’मध्ये जाऊन भेट घेतली. अत्यंत भावनापूर्ण वातावरणात झालेल्या चर्चेत बायडेन यांनी, वंशद्वेषामुळे आपल्या सर्वांमध्ये फार पूर्वीपासून फूट पाडली गेली हे वास्तव आहे, अशी खंत व्यक्त केली. (George Floyds family meet with US President Joe Biden on the one year anniversary of his death)

जॉर्ज फ्लॉइड यांचा पोलिसांच्या अत्याचारात मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेसह जगभरात ‘ब्लॅक लाइव्हज्‌ मॅटर’ ही चळवळ पसरली होती. हा अत्याचार वंशद्वेषातूनच झाल्याचे उघड झाले होते. या घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त फ्लॉइड यांच्या कुटुंबीयांनी ज्यो बायडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची भेट घेतली. वंशद्वेषाविरोधात कायदा करण्यास कटिबद्ध असल्याचे आश्‍वासन बायडेन यांनी फ्लॉइड कुटुंबीयांना दिले. बायडेन आणि हॅरिस यांच्याबरोबरील चर्चा समाधानकारक झाल्याचे फ्लॉइड कुटुंबीयांनी सांगितले.

कुटुंबाला व्हाईट हाऊसकडून निमंत्रण

बायडन यांनी ट्विट करत म्हटलं की, ओवल ऑफिसमध्ये मी जॉर्ज फ्लॉइडच्या कुटुंबियांशी भेट घेतली. गेल्या एक वर्षापासून या लोकांनी मोठ्या साहसाचा परिचय करुन दिला आहे. खासकरुन फ्लॉइड यांची छोटी मुलगी जिच्याशी मी आज भेटलो. फ्लॉइडच्या अंतिम संस्कारांच्या एक दिवस आधी तिने मला म्हटलं होतं की, डॅडींनी जगाला बदलून टाकलंय.

तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांनी म्हटलंय की, फ्लॉइड यांना न्याय मिळवून द्यायची प्रक्रिया अद्याप सुरु आहे. त्यांनी म्हटलं की, डेमोक्रॅटीक आणि रिपब्लिकन यांनी एकत्र मिळून एक महत्त्वाचे विधेयक पारित केलं आहे, त्याचं मी ठामपणे समर्थन करतो. मला आशा आहे की या विधेयकाला लवकरच मंजूरीसाठी माझ्या टेबलवर आणलं जाईल. 2020 मध्ये 46 वर्षीय कृष्ण वर्णीय फ्लॉइड यांना जमिनीवर पाडल्यानंतर तत्कालिन पोलिस ऑफिसन डेरेक चाऊविन यांनी जवळपास नऊ ते दहा मिनिटांपर्यंत गळा दाबला होता ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी डेरेकला दोषी मानन्यात आलं असून न्यायालयाकडून 25 जून रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. तर इतर तीन आरोपींवर सध्या खटला सुरु आहे.