
गिलगीट-बाल्टिस्तानवर चीनचा कब्जा शक्य
गिलगीट-बाल्टिस्तान : पाकिस्तानच्या ताब्यात असलेला गिलगीट-बाल्टिस्तान हा जम्मू-काश्मीरमधील भूभाग भारताचा असला तरी तो परस्पर चीनला भाडेततत्वावर देण्याचा विचार पाकिस्तान करत असल्याचा दावा एका संस्थेने आपल्या अहवालात केला आहे. पाकिस्तानवर सध्या कर्जाचा प्रचंड डोंगर असून ते कर्ज फेडण्यासाठीच हा ‘अव्यापारेषू’ व्यवहार करण्याचा विचार ते करत असल्याचा अंदाज आहे. काराकोरम नॅशनल मूव्हमेंट या संस्थेच्या अध्यक्षा मुमताज नागरी यांनी अहवालात गिलगीट बाल्टिस्तानबाबत हा विचार व्यक्त केला आहे. गिलगीट बाल्टिस्तान या आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेला भाग भविष्यातील युद्धभूमी बनू शकते, असे नागरी यांनी म्हटल्याचे पाकिस्तानमधील ‘अल अरेबिया पोस्ट’ने म्हटले आहे.
गिलगीट बाल्टिस्तानचा उत्तर भाग चीनच्या सीमेला लागून आहे. काश्मीरमधील गिलगीट बाल्टिस्तान या भागावर पाकिस्तानचा बेकायदा ताबा आहे. त्यामुळे जो भाग मुळातच पाकिस्तानचा नाही तो भाग चीनला भाडेतत्वावर देण्याचा त्यांचा विचार आहे. पाकिस्तानने गिलगीट बाल्टिस्तान भाग चीनच्या ताब्यात दिला तर चीनच्या विस्तारवादी धोरणाला बळ मिळेल. पाकिस्तानने या आधी चीनला दिलेल्या भूभागाचा त्यांनी वापर केला असून गिलगीट बाल्टिस्तानबाबतही तेच होऊ शकते, असे अहवालात म्हटले आहे. चीनच्या महत्त्वाकांक्षी चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरचा मार्ग गिलगीट बाल्टिस्तानमधूनच जात असल्याने चीनही या व्यवहाराला उत्सुक असेल, असे नागरी यांचे म्हणणे आहे.
अमेरिकेचा रोष शक्य
गिलगीट बाल्टिस्तान हा भारताचा अविभाज्य भाग असल्याने पाकिस्तानच्या या व्यवहाराला भारत प्रचंड विरोध करेल. याशिवाय, पाकिस्तानने हा व्यवहार केल्यास त्यांना चीनकडून प्रचंड प्रमाणात पैसा मिळून कर्जफेड होऊ शकते, मात्र त्यामुळे अमेरिका नाराज होऊन आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मिळू शकणारी तीन अब्ज डॉलरची कर्जमाफी रद्द होऊ शकते, अशीही शक्यता अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय, भविष्यातही पाकिस्तानला नाणेनिधी, जागतिक बँक आणि इतर वित्त संस्थांकडून कर्ज मिळण्याची शक्यता धूसर होईल.
Web Title: Gilgit Baltistan Pakistan Jammu Kashmir Pakistan Claims To Leasing Land Of India To China
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..