स्टीफन हॉकिंग- मानव जातीचे कल्याण शोधणारा द्रष्टा शास्त्रज्ञ

डॉ. सुभाष देसाई
गुरुवार, 15 मार्च 2018

‘धर्म आणि विज्ञान’ या विषयात मी शिवाजी विद्यापीठातून पीएच.डी. करत होतो. या अभ्यासासाठी स्टीफन हॉकिंग यांचे ‘दि ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम’ हे पुस्तक अभ्यासले होते. त्यामध्ये धर्म आणि विज्ञान याबाबत स्पष्ट कल्पना आहे. वाफेच्या इंजिनाचा शोध लावणाऱ्या जेम्स वॅटच्या चहाच्या किटलीचे झाकण उडाले ही लोककथा आहे. त्याचप्रमाणे न्यूटनला सफरचंद खाली पडताना गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला, ही कपोलकल्पित कथा आहे. हे स्टीफन्स हॉकिंग यांच्या या पुस्तकातून समजले.

‘धर्म आणि विज्ञान’ या विषयात मी शिवाजी विद्यापीठातून पीएच.डी. करत होतो. या अभ्यासासाठी स्टीफन हॉकिंग यांचे ‘दि ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम’ हे पुस्तक अभ्यासले होते. त्यामध्ये धर्म आणि विज्ञान याबाबत स्पष्ट कल्पना आहे. वाफेच्या इंजिनाचा शोध लावणाऱ्या जेम्स वॅटच्या चहाच्या किटलीचे झाकण उडाले ही लोककथा आहे. त्याचप्रमाणे न्यूटनला सफरचंद खाली पडताना गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला, ही कपोलकल्पित कथा आहे. हे स्टीफन्स हॉकिंग यांच्या या पुस्तकातून समजले.

या अभ्यासादरम्यानच अवकाश शास्त्रज्ञ आर. व्ही. भोसले यांची भेट होत होती. माझ्या संशोधनात तत्त्वज्ञानाचा विषय महत्त्वाचा होता. त्यामध्ये कालाची संकल्पना महत्त्वाची ठरत होती. या संदर्भात श्री. भोसले यांनी मला इस्रोचे संचालक डॉ. एकनाथ चिटणीस यांची भेट घडवून आणली. त्यांची मी घेतलेली मुलाखत सर्वप्रथम दैनिक ‘सकाळ’ने प्रसिद्ध केली. पुढे कोल्हापूर प्रेस क्‍लबने एका कार्यक्रमामध्ये ‘माझ्या कालाची जन्मकथा’ या डॉ. स्टीफन हॉकिंग यांच्या आंतरराष्ट्रीय सर्वाधिक खपाच्या ‘दि ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम’ याचा अनुवाद केलेले पुस्तक प्रकाशित झाले. यापूर्वी मी माझे पीएच.डी.च्या प्रबंधाचे पुस्तक केंब्रिज विद्यापीठाला पाठवले. त्यावर डॉ. हॉकिन्स यांचा चार ओळींचा अभिप्रायही आला. 

मी ठरवले, एक दिवस या थोर शास्त्रज्ञाची भेट घ्यायची आणि त्यासाठी मी त्यांना पत्र पाठवले. इकडे मी इंग्लंडचा व्हिसा मिळेल की नाही, याविषयी साशंक होतो; पण तो मिळाला. फ्रान्समध्ये मी दोन आठवडे राहिलो. तेथून इटली, स्वित्झर्लंड करत तेथून लंडनला पोचलो. कोल्हापूरला केंब्रिज विद्यापीठातून पत्र हॉकिन्स यांच्या भेटी संदर्भात येण्याची शक्‍यता मी माझ्या मित्रांना बोलून दाखवली होती. जर पत्र आले तर ते लंडनला एका व्यक्तीकडे पाठविण्याचे मी कोल्हापुरातील मित्रांना आधीच सांगून ठेवले होते. तसे ते पत्र कोल्हापूरला आले होते. ते पत्र माझ्या मित्रांनी मला लंडनमधील त्या गृहस्थाकडे पाठवले.

लंडनमध्ये ते गृहस्थ मला हॉटेलवर भेटायला आले. तेव्हा मी त्यांना पत्रासंदर्भात विचारले, पण त्यांनी पत्र आले नसल्याचे सांगितले व उत्सुकतेने त्यांनी कसले पत्र येणार आहे, असे विचारले. मी म्हटले आइन्स्टाइनच्या तोडीचे केंब्रिज मॅथॅमेटीशियन स्टीफन हॉकिंग यांची मी भेट मागितली आहे. त्यांच्या भेटी संदर्भातील पत्र येणार आहे. यावर त्या सद्‌गृहस्थाने मला अर्धातास चांगलेच सुनावले. तुम्ही भारतात राहून अशी स्वप्ने कशी बघता? जगप्रसिद्ध असा शास्त्रज्ञ तुम्हाला पत्र पाठवून वेळ देईलच कशाला? त्याला दुसरी काही कामे नाहीत का? या त्यांच्या बोलण्याने मी निराश झालो. मला रडूही कोसळले आणि नंतर माझी महिनाभराची युरोपची सहल आटोपून मी पॅरिसला आलो. दुसऱ्या दिवशी पहाटे माझे विमानाचे तिकीट निश्‍चित झाले होते. इतक्‍यात मी ज्या माझ्या मित्र पाहुण्यांकडे उतरलो होतो, त्यांच्याकडे इंग्लंडहून फोन आला आणि ते गृहस्थ मला सांगत होते मला माफ करा. डॉ. स्टीफन्स हॉकिंग यांनी तुम्हाला भेटायचे मान्य केले आहे आणि तारीख उद्याचीच आहे, पण आता मला भेट घेणे शक्‍य नव्हते. त्यामुळे मी आयुष्यातील एक सुवर्णसंधी कायमची हरवून बसलो. 

स्टीफन हॉकिंग यांनी महास्फोटापासून कृष्णविवरापर्यंत महत्त्वपूर्ण विचार त्यांच्या पुस्तकात मांडले आहेत. ईश्‍वरी कल्पनेशिवाय विश्‍वनिर्मितीची संकल्पना धाडसाने मांडणारा असा तो शास्त्रज्ञ आपल्यात आज नाही. जगातील महत्त्वाच्या शास्त्रज्ञांची १९६४ मध्ये बैठक पोपनी बोलावली होती. त्यात त्यांनी साऱ्यांना इशारा दिला की विश्‍वनिर्मितीच्या क्षणाचा विचार आणि संशोधन तुम्ही कोणी करू नका. कारण तो क्षण ईश्‍वराच्या मालकीचा असतो. फक्त हॉकिन्सनी विनोदाने म्हटले आहे की, सुदैवाने मी अगोदर केलेले भाषण पोपना कळलेच नाही. नाहीतर ब्रुनोनंतर ३०० वर्षांनी जन्मलेल्या मलाही त्यांनी ब्रुनोप्रमाणे जिवंत जाळले असते. स्टीफन हॉकिंग यांच्या पुस्तकात एकही गणिती सूत्र नाही. त्यामुळे ते पुस्तक वाचनीय झाले आहे. जगातील बायबल आणि शेक्‍सपिअर या सर्वाधिक खपाच्या पुस्तकानंतर तिसरा क्रमांक हॉकिंग यांच्या पुस्तकाचा लागतो. २३ भाषांमध्ये या पुस्तकाचा अनुवाद झाला होता. २४ साव्या (मराठी) भाषेचा अधिकार त्यांनी मला दिला. त्यांचे वकील अमेरिकेत होते. आम्हा तिघांमध्ये त्रिपक्षीय करार झाला. त्यावरची या महान शास्त्रज्ञाची सही हा माझा अमूल्य ठेवा आहे. 

हॉकिंग हे जगातील अपंगांचे स्फूर्तिस्थानही आहेत. जगाला नवे विचार, नवी प्रेरणा देणारे स्फूर्ती देवताही आहे. अणुस्फोटासारखी घटना आणि पर्यावरणाचा विध्वंस यातून ती ठिसूळ पृथ्वी तग धरू शकणार नाही. त्यामुळे पृथ्वीसदृश स्थळ शोधा आणि मानववंश जगवायचा असेल, तर त्या गृहावर वस्ती करा, असा द्रष्टा सल्ला देणारा, देव नाकारणार; पण दैवी गुण संपन्न असा शास्त्रज्ञ निघून जाणे, हे खूप खूप दुःखदायक आहे.

माझ्यासारख्या कोल्हापूरस्थित नगण्य पत्रकार संशोधकाला त्यांनी दिलेली दाद हीच त्यांच्यामधील माणुसकीची सहृदयता दाखवते. त्यांना विनम्र श्रद्धांजली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: global news article dr subhash desai on stephen hawking