
कोरोनाच्या वैश्विक साथीमुळे मानसिक आरोग्यावर परिणाम
पुणे : कोरोनाच्या वैश्विक साथीमुळे अनेकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. मात्र, याबद्दल खुलेपणाने बोलणे आणि समुपदेशन घेण्यासंदर्भात अजूनही देशातील ५९ टक्के तरुणाईला योग्य वाटत नाही. त्यामुळे देशातील मानसिक आरोग्याची स्थिती अधिक भयानक स्थितीत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संयुक्त राष्ट्रे बाल निधीच्या (युनिसेफ) वतीने नुकताच ‘द स्टेट ऑफ द. वर्ल्डस चिल्ड्रन’ या अहवालातून ही बाब समोर आली आहे.
युनिसेफच्या वतीने मानसिक आरोग्याशी निगडित स्थिती जाणून घेण्यासाठी २१ देशातील नागरिकांचा अभ्यास करण्यात आला आहे. यामध्ये भारत, अमेरिका, बांगलादेश, पेरू, जपान, ब्रिटन, ब्राझील, युक्रेन आदी देशांचा समावेश आहे. तसेच १५ ते २४ वर्षे आणि ४० वर्षां पुढील अशा दोन वयोगटातील नागरिकांचे मानसिक आरोग्याबाबतचे मत जाणून घेण्यात आले आहे
त्यानुसार भारतातील केवळ ४१ टक्के तरुणांचे म्हणणे आहे की, इतरांबरोबर मानसिक आरोग्याच्या समस्यांविषयी बोलल्याने त्यातून बाहेर पडणे शक्य आहे. तर २०२० ते २१ दरम्यान भारतात २८६ दशलक्ष मुले शाळेबाहेर होती. त्यातील केवळ ६० टक्के मुलांना डिजिटल पद्धतीने शिक्षण घेता आले. त्यामुळे शालेय शिक्षणात आलेल्या अडचणींमुळे भविष्यावर होणारा परिणाम या बाबींमुळे अनेक मुलांना मानसिक त्रास जाणवू लागला आहे.
असा झाला अभ्यास
- भारतासह २१ देशातील २० हजाराहून अधिक लोकांशी चर्चा
- फेब्रुवारी २०२१ ते जून २१ या कालावधित झाला अभ्यास
- १५ ते २४ आणि ४० च्या वरील वयोगटातील लोकांचा समावेश
अहवालातील ठळक बाबी
- देशातील १५ ते २४ वर्षे वयोगटातील १४ टक्के तरुणाईने अनेकदा मानसिक ताण निर्माण होण्याची किंवा गोष्टी करण्यात कमी रस असल्याचे सांगितले
- कोरोनामुळे समाजाशी तुटलेले नातं, शिक्षण प्रवाहातून बाहेर पडणे, आर्थिक अडचणी मानसिक आरोग्याच्या समस्यांची प्रमुख कारणे
- मानसिक आरोग्याच्या स्थितीमुळे देशाला २०१२-२०३० दरम्यान सुमारे एक ट्रिलियन डॉलर्सचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता
मानसिक आरोग्याच्या समस्या का वाढतात ?
- मानसिक आरोग्याबाबत जनजागृती, संरक्षण आणि काळजीचा अभाव
- मानसिक ताणाबाबत खुलेपणाने बोलण्यास टाळाटाळ
- मानसिक त्रासांबाबत बोलल्यास गैरसमजांमुळे त्यांच्या प्रती होणारे गैरवर्तनाची भीती
मानसिक आरोग्याबाबत मत (२१ देशातील विविध वयोगटाची टक्केवारी)
मत ः १५ ते २४ वर्षे वयोगट ः ४० वर्षांपेक्षा जास्त
मानसिक आरोग्याची समस्या सोडविण्यासाठी इतरांबरोबर याविषयी बोलणे ः ८३ ः ८२
कोणाशी याविषयी न बोलणे ः १५ ः १७
हे करणे गरजेचे
- मानसिक आरोग्य क्षेत्रात आर्थिक गुंतवणूक गरजेची
- लिंग-आधारित आणि इतर हिंसाचार प्रतिबंधात्मक धोरणांची निर्मिती
- आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक सुरक्षा आदींसंबंधी समन्वय आवश्यक
- मानसिक आजाराला स्वीकारणे आणि त्या विषयी मोकळ्यापणाने बोलणे गरजेचे