प्रेरणास्रोत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

आयुष्यात आलेल्या आजाराचा सामना करत त्यावर मात करून संशोधक, शास्त्रज्ञांना प्रेरणादायी, आदर्शवत शास्त्रज्ञ म्हणजे स्टीफन हॉकिंग. काही कारणांनी त्यांना प्रत्यक्ष भेटता आले, अनुभवता आले हे खूप मोलाचे आहे.

आयुष्यात आलेल्या आजाराचा सामना करत त्यावर मात करून संशोधक, शास्त्रज्ञांना प्रेरणादायी, आदर्शवत शास्त्रज्ञ म्हणजे स्टीफन हॉकिंग. काही कारणांनी त्यांना प्रत्यक्ष भेटता आले, अनुभवता आले हे खूप मोलाचे आहे.

मी पीएच.डी. केल्यानंतर पुढील संशोधनासाठी केंब्रिजला गेलो. माझा संशोधनाचा आणि त्यांचा विषय वेगळा होता, परंतु हॉकिंग यांचे विद्यार्थी बनार्ड कार यांच्या घरी माझी आणि त्यांची प्रथम भेट झाली. आजपर्यंत आपण ज्यांच्याबद्दल ऐकत आलो आहोत, त्यांना प्रत्यक्ष पाहण्याचा, अनुभवण्याचा योग आला होता. मी आणि माझी पत्नी एकाच क्षेत्रात असल्याने आम्ही तिथे राहत होतो. त्या ठिकाणी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने हॉकिंग आले होते. त्यांना सहजासहजी बोलता येत नव्हते.

एखादा प्रश्‍न विचारल्यावर बोलण्यासाठी वेळ लागत होता. यामुळे सुरवातीला मी त्यांच्याशी फार बोललो नाही. मुळात त्यांना प्रश्‍न विचारलेले फार आवडतात; परंतु त्यांना होत असलेला त्रास लक्षात घेता प्रश्‍न विचारणे सयुक्तिक वाटले नाही. काही कालावधीनंतर त्यांची ‘लुकेसियन्स प्रोफेसर’ म्हणून नियुक्ती झाली. ही नियुक्ती अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. यानंतर त्यांची अनेक व्याख्याने ऐकण्याचा मला योग आला. संगणकाच्या मदतीने आणि स्लाइडच्या माध्यमातून ते व्याख्याने देत. ही व्याख्याने विलक्षण असत. त्या वेळी त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्त्वाची ओळख झाली.

बाहेरून आलेल्या प्राध्यापकांना जेवणाच्या वेळी त्यांना भेटण्याची संधी मिळत असे. एरवीही ते केंब्रिजच्या आवारात आपल्या सायकलवजा मोटारीतून सहजतेने फिरताना दिसायचे. त्या वेळी त्यांच्याबद्दल विशेष आदर वाटायचा. आपल्या आजाराचा कोणताही बाऊ न करता ते अत्यंत सहजतेने सर्वत्र फिरायचे. हॉकिंग यांच्या बॅचचे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ प्रा. मॉटिरीस यांनी एकदा भोजनाचे आयोजन केले होते. या ठिकाणी अचानक कोणाला तरी या परिसरातील प्रसिद्ध इंडियन रेस्टॉरंटची आठवण झाली.

कोणालाच त्याचे नाव आठवत नव्हते. शेवटी हॉकिंग यांनी त्याचे नाव सांगितले. घशातून विशिष्ट पद्धतीचा आवाज काढत ते बोलायचे. त्यांच्या निकटवर्तीयांनाच ते बोलणे लक्षात येत असे. त्यांनी नाव सांगितल्यावर आम्ही सगळे अवाक्‌ झालो. आजार कितीही गंभीर असला तरी त्यांचे वागणे अगदी एखाद्या ‘नॉर्मल’ व्यक्तीसारखेच होते. अर्थात मी त्यांना पहिल्यांदा पाहिले त्या वेळी धक्काच बसला होता. जागतिक पातळीवर दिमाखात फिरणाऱ्या या शास्त्रज्ञाला आजारपणाचे काही देणे-घेणे नव्हते.

त्यांची संशोधनाची पद्धती अतिशय विलक्षण होती. आपण सर्वसामान्यपणे एखादे संशोधन करत असताना त्याची टिपणे काढतो, त्या नोंदी एखाद्या वहीत अथवा आता संगणकावर ठेवतो. दुसऱ्या दिवशी मागील नोंदीवरून पुढील अभ्यास सुरू होतो. हॉकिंग यांच्याकडे एकही कागद, पेन नसायचा. ते सर्व नोंदी आपल्या मेंदूत साठवून ठेवत. कारण त्यांना लिहिण्याचा प्रश्‍नच नव्हता. साध्या नोंदी ठेवणे सोपे आहे; परंतु गणितीय नोंदी डोक्‍यात साठवून ठेवणे केवळ अशक्‍य आहे. ही अशक्‍यप्राय गोष्ट ते करत. आमच्या दृष्टीने हे खरोखरच अनाकलनीय होते. दुसरी बाब म्हणजे एखाद्या विषयाचे संशोधन काही गटांमार्फत केले जायचे. परंतु हॉकिंग यांनी सर्व विषयांचे संशोधन एकट्याच्या जिवावर केले.

हॉकिंग यांची व्याख्याने ऐकणे हा खरोखरीच विलक्षण अनुभव असायचा. व्याख्यानानंतर प्रश्‍नोत्तराचा तास खूपच रंगायचा. त्यांना प्रश्‍न विचारल्यानंतर स्मित हास्य करत अत्यंत मार्मिक पद्धतीने ते उत्तर देत. त्यांची उत्तरे एक किंवा दोन शब्दांमध्येच असायची. परंतु त्यामध्ये संपूर्ण आशय सामावलेला असायचा. कितीही मोठा आणि कितीही वेळा प्रश्‍न विचारला तरी ते रागवत नसत. शांतपणे उत्तर द्यायचे. ज्या व्यक्तीला आजाराचे निदान झाल्यावर अवघे दोन वर्षांचे आयुष्य सांगितले होते, त्या व्यक्तीने संशोधन क्षेत्रात स्वत:चे केवळ वलयच निर्माण केले नाही, तर ते ‘आयकॉनिक’ स्थान निर्माण केले. त्यांना आपल्या जगण्याचा कोणताही संकोच वाटत नव्हता. डिनर पार्ट्यांमध्ये त्यांना लहान मुलासारखे भरवावे लागायचे; परंतु त्यांना त्याचे वाईट वाटत नव्हते. काही व्यक्ती कायमस्वरूपी लक्षात राहतात, त्यामध्ये हॉकिंग यांचा समावेश आहे.

आजारावर मात करत जिद्दीच्या जोरावर त्यांनी संशोधन क्षेत्रात प्रेरणादायी आणि आदर्शवत स्थान निर्माण केले. (शब्दांकन - अशिष तागडे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: global news stephen hawking dies ajit kembhavi