esakal | UNGA : अण्वस्त्रमुक्तीसाठी सर्वांचे सहकार्य गरजेचे
sakal

बोलून बातमी शोधा

अण्वस्त्रमुक्तीसाठी सर्वांचे सहकार्य गरजेचे

UNGA : अण्वस्त्रमुक्तीसाठी सर्वांचे सहकार्य गरजेचे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

न्यूयॉर्क : अण्वस्त्रमुक्त जगाचे लक्ष्य साध्य करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सर्व सदस्यांबरोबर खुल्या वातावरणात चर्चा करण्याची भारताची तयारी आहे. अण्वस्त्रमुक्तीचे हे स्वप्न टप्प्याटप्प्यातच साध्य होणे शक्य असून त्याला सर्व देशांची मदत आवश्‍यक आहे, असे भारताने आज संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत स्पष्ट केले.

अण्वस्त्रांपासून संपूर्ण मुक्ती मिळविण्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त आमसभेने एका बैठकीचे आयोजन केले होते, त्यात भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी सहभाग घेतला होता. ‘‘सर्व जगाने एकत्रित मिळून कटिबद्धता दर्शविल्यास अण्वस्त्रमुक्ती टप्प्याटप्प्याने करणे शक्य आहे. यासाठीचा आराखडा जागतिक असावा आणि यामध्ये कोणालाही अपवाद केले जाऊ नये. यासाठी येणाऱ्या नव्या कल्पनांचे भारताकडून नेहमीच स्वागत असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या भाषणातून हेच म्हटले होते. याच खुलेपणाच्या भावनेतून अण्वस्त्रमुक्तीबाबत आम्ही सर्व सदस्य देशांबरोबर चर्चा करण्यास तयार आहोत,’’ असे श्रृंगला म्हणाले. भारत ही एक जबाबदार अणुशक्ती असून कोणाही विरोधात अण्वस्त्रांचा सर्वप्रथम वापर न करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असे श्रृंगला यांनी स्पष्ट केले.

लसपुरवठ्याबद्दल भारताचे आभार

आमसभेत २१ ते २७ सप्टेंबर या काळात झालेल्या चर्चेत सदस्य देशांच्या प्रमुखांनी आणि प्रतिनिधींनी कोरोना परिस्थितीवर चर्चा केली. यावेळी अनेक देशांनी भारताने योग्य वेळी केलेल्या लसपुरवठ्याचे कौतुक केले. भारत आणि काही देशांनी अनेक देशांना ऐन कोरोना संकटाच्या काळात मोठ्या प्रमाणात लस पुरवठा केला. तसेच, इतर अनेक वैद्यकीय साहित्याचाही पुरवठा केला होता. सुरिनाम, नौरु, नायजेरिया, सेंट लुसिया यासह अनेक छोट्या देशांनी भारत, अमेरिका, चीन यांचे आभार मानले.

‘भारत-पाकबद्दल आशा’

संयुक्त राष्ट्रासारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठाचा वापर पाकिस्तानने कायमच भारताविरोधात गरळ ओकण्यासाठी केला असून यंदाच्या आमसभेतही तेच पहायला मिळाले. भारतानेही पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले. आमसभेत भारत-पाकिस्तानने असे आरोप-प्रत्यारोप केले असताना, सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी मात्र, भविष्यात हे दोन्ही देश सकारात्मक चर्चा करतील, अशी आशा व्यक्त केली आहे. भारतीय उपखंडातील शांततेबाबत संयुक्त राष्ट्रांना चिंता वाटत असून लवकरच दोन्ही देशांच्या प्रमुखांशी बोलणार असल्याचे गुटेरेस यांनी आज सांगितले.

loading image
go to top