#HowDareYou 16 वर्षीय ग्रेटा जगातील नेत्यांवर संतापली, म्हणाली....

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

हवामान कृती परिषदेला मोदींचीही उपस्थिती
'ग्लोबल वॉर्मिंगचे संकट दूर करायचे असेल व त्यावर मात करायची असेल तर सध्या करत असलेले प्रयत्न कमी पडत आहेत, हे आधी समजून घ्यायला हवे. आता फक्त चर्चा करून चालणार नाही, तर कृती करण्याची गरज आहे.' असे मोदींनी या परिषदेत सांगितले.    

न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्रांची महत्त्वाची समजली जाणारी हवामान कृती परिषद सध्या चांगलीच गाजत आहे ती एका 16 वर्षीय मुलीमुळे... ग्रेटा थनबर्ग असं या लहान स्विडिश पर्यावरण कार्यकर्तीचं नाव असून पर्यावरण संवर्धनासाठी ती मोलाचं योगदान देत आहे. तिने हवामान कृती परिषदेत पर्यावरण संवर्धनाबाबत संताप व्यक्त केला. तिने या परिषदेत चक्क अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसह जगभरातील नेत्यांवर धारेवर धरलं असून, 'तुम्ही माझं बालपण हिरावून घेतलंय' असा थेट आरोप केला आहे. 

विश्वात सध्या जागतिक तापमान वाढ म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग आणि जगातील हवामान बदलाचे मोठे संकट घोंघावत आहे. यावर मात करण्यासाठी व उपाय योजना करण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांकडून 'युएन हवामान कॉती परिषदे'चे आयोजन करण्यात आले होते. 21 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर असा या परिषदेचा कालावधी होता. यात अनेक तज्ज्ञ येऊन हवानासंदर्भात आपली मतं मांडतात. यातील एका चर्चेसाठी ग्रेटा थनबर्ग हिला आमंत्रित करण्यात आले होते. 

काय संतापली ग्रेटा?
या परिषदेत बोलताना ग्रेटा म्हणाली, 'सध्या पर्यावरणाकडे दुर्लक्ष केलं जातंय ते अत्यंत चुकीचं असून हे इथेच थांबायला हवं. मी इथे थांबायला नकोय, समुद्रापलीकडच्या शाळेत मी निघून जायला हवंय. तुम्ही आम्हा तरूणांकडे आशेच्या दृष्टीने कसे बघू शकता? जैवसंस्था नाश पावतायत, लोक मरण पावताहेत. विज्ञान गेले 20 वर्ष स्पष्ट संदेश देतंय. तरीही तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करताय. हिंमत कशी होते तुमची अशी वागायची. तुमच्या पोकळ आणि खोट्या शब्दांमुळे माझी स्वप्न व बालपण हिरावलं गेलंय...' असा आरोप तिने जगातील सर्व नेत्यांवर केलाय. 

परिषदेला मोदींचीही उपस्थिती
'ग्लोबल वॉर्मिंगचे संकट दूर करायचे असेल व त्यावर मात करायची असेल तर सध्या करत असलेले प्रयत्न कमी पडत आहेत, हे आधी समजून घ्यायला हवे. आता फक्त चर्चा करून चालणार नाही, तर कृती करण्याची गरज आहे.' असे मोदींनी या परिषदेत सांगितले.    

कोण आहे ग्रेटा थनबर्ग?
ग्रेटा ही ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदल थांबवण्यासाठी प्रयत्नात असणारी स्विडिश कार्यकर्ती आहे. हवामानातील बदल थांबवण्यासाठी तिने स्विडिश संसदेबाहेर संप सुरू केला होता. त्याचबरोबर तिने या विषयासंदर्भात शाळेतही संप केला होता. नोव्हेंबर 2018 मध्ये तिने टेडेक्सटॉकहोममध्ये भाषण दिले होते, जे प्रतिष्ठेचे समजले जाते. यावर्षीप्रमाणे तिने गेल्या वर्षीही 'युएन हवा कृती परिषद 2018'मध्ये संबोधित केले होते.   

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Greta Thunberg speaks at UN climate change conference 2019