हाफीज सईद दोषी

पीटीआय
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात-उद्‌-दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या हाफीज सईद याला दहशतवादी कारवायांना वित्तपुरवठा केल्याप्रकरणी दहशतवादविरोधी विभागाने आज न्यायालयात दोषी जाहीर केले.

लाहोर - मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात-उद्‌-दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या हाफीज सईद याला दहशतवादी कारवायांना वित्तपुरवठा केल्याप्रकरणी दहशतवादविरोधी विभागाने आज न्यायालयात दोषी जाहीर केले.

तत्पूर्वी संयुक्त राष्ट्रसंघाने याआधीच सईदला दहशतवादी घोषित केले होते, तसेच अमेरिकेनेही त्याला पकडण्यासाठी दहा दशलक्ष डॉलरचे बक्षीस जाहीर केले आहे. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा )लाहोरपासून ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या गुजरानवाला येथील दहशतवादविरोधी न्यायालयामध्ये आज त्याला कडेकोट बंदोबस्तात सादर करण्यात आले होते. दहशतवादी कारवायांना वित्तपुरवठा केल्याप्रकरणी पंजाब पोलिसांनी सईदविरोधात आरोपपत्र सादर  केले आहे.

दरम्यान, सईदला या प्रकरणामध्ये १७ जुलै रोजीच अटक करण्यात आली होती. या प्रकरणामध्ये जामीन मिळावा म्हणून तो लाहोरहून गुजरानवालापर्यंत रोज फेऱ्या मारत होता. सईदच्या जिवाला असलेला धोका लक्षात घेऊन त्याला लाहोरमधील कोट लखपात तुरुंगामध्ये ठेवण्यात आले आहे.

इम्रान सरकारची कारवाई
पाकिस्तानमध्ये सत्तांतर झाल्यानंतर इम्रान खान यांच्याकडे सरकारची सर्व सूत्रे आली होती. इम्रान यांनी सईदच्या मुसक्‍या आवळायला सुरवात केली असून, त्याच्या फलाह-ए-इन्सानियत या संघटनेच्या मालमत्तांवरदेखील टाच आणण्यात आली आहे. या संघटनेची देशभर धर्मप्रचार केंद्रे आणि मशिदी असून या धार्मिक संस्थांच्या नावे मोठ्या प्रमाणावर स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. ही सर्व मालमत्ता जप्त करण्याचा सरकारचा विचार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hafiz Saeed was declared guilty