
Hamas Vs Israel: इस्रायईलचे रणगाडे आता प्रत्यक्ष उत्तर गाझाच्या सीमेवर येऊन पोचल्याने हे युद्ध आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आमच्या कारवाईमध्ये ‘हमास’चे शेकडो दहशतवादी ठार झाल्याचा दावा इस्रायली लष्कराकडून करण्यात आला आहे. मागील चोवीस तासांमध्ये आम्ही सहाशेपेक्षाही अधिक लक्ष्यांचा वेध घेतल्याचे लष्कराच्या प्रवक्त्याने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. दुसरीकडे ‘हमास’नेही आम्ही जोरदार मारा केल्याने इस्राईलच्या लष्कराला माघारी परतावे लागल्याचे म्हटले आहे.
इस्राईलच्या लष्करी कारवाईमुळे या युद्धाची व्यापकता वाढणार असून त्यामुळे गाझातील भुकेचा प्रश्न अधिक गंभीर होणार असल्याचा इशारा अमेरिकेकडून देण्यात आला आहे. इस्राईलला साथ देणाऱ्या अमेरिकेने या संघर्षात थेट स्वतःचे लष्कर उतरविण्यास मात्र स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे.
उत्तर गाझामध्ये इस्राईलच्या लष्कराला ‘हमास’कडून तीव्र हल्ल्याचा सामना करावा लागला. गाझा शहराच्या किनारी भागामध्ये असलेल्या झायतून जिल्ह्यात इस्राईलचे रणगाडे घुसल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे उत्तर आणि दक्षिण भागाला जोडणारे रस्ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत.
इस्राईलच्या लष्कराने सालाहिद्दीन रोड पूर्णपणे उद्ध्वस्त केला असून या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनावर इस्राईलच्या लष्कराकडून बेछूट गोळीबार केला जात असल्याचा दावा एका स्थानिकाकडून करण्यात आला.
दरम्यान जीवितहानी टाळण्यासाठी गाझातील नागरिकांनी दक्षिणेच्या दिशेने स्थलांतर करावे, असा इशारा इस्राईलकडून याआधीच देण्यात आला होता. या इशाऱ्यानंतर देखील हजारो नागरिक याच भागात अडकून पडले आहेत.
इस्राईलच्या हल्ल्यामध्ये गाझातील आठ हजार नागरिक मरण पावले असून त्यात अनेक महिला आणि मुलांचा देखील समावेश असल्याचे स्थानिक यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे. इस्राईलच्या हल्ल्यानंतर गाझापट्टीमध्ये अक्षरशः अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले असून रुग्णालयाला होणारा वीज पुरवठाही ठप्प झाला आहे. यामुळे डॉक्टरांना रुग्णांवर अंधारामध्ये उपचार करावे लागत आहे.
अमेरिका लष्कर पाठविणार नाही
या संघर्षामध्ये अमेरिकेने इस्राईलला पाठिंबा दिला असला तरीसुद्धा आम्ही तिथे लढण्यासाठी लष्कर पाठविणार नसल्याचे अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी म्हटले आहे. ‘हमास’चा नायनाट करण्यासाठी आम्हाला त्यांचे बंकर नष्ट करावे लागतील, असे इस्रायली लष्कराकडून सांगण्यात आले आहे. रुग्णालये, शाळा आणि मशिदींमधून हमासचे दहशतवादी त्यांची सूत्रे हलवित असल्याचा आरोप इस्राईलच्या लष्कराने केला आहे. ‘हमास’ने ओलिसांना याच भागामध्ये ठेवल्याचा आरोप इस्राईलकडून करण्यात आला आहे.
रुग्णालय रिकामे करणे अशक्य
इस्राईलने उत्तर गाझामध्ये असलेले अल् कुद्स हे रुग्णालय रिकामे करण्याचा इशारा दिला असून जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) मात्र त्याला कडाडून विरोध केला आहे. या रुग्णालयामध्ये मोठ्या संख्येने जखमींना दाखल करण्यात आले असल्याने त्यांना येथून बाहेर काढणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले. याच रुग्णालयावर इस्राईलच्या लष्कराने हल्ला केला असल्याचा आरोप ‘हमास’ या संघटनेकडून करण्यात आला आहे. इस्राईलच्या लष्कराकडून रुग्णालयांना लक्ष्य करून हल्ले होऊ लागल्याने लोकांची मोठी धावपळ सुरू झाली आहे. अन्नधान्य, औषधे आणि अन्य जीवनावश्यक वस्तू घेऊन ३३ ट्रक आज गाझामध्ये दाखल झाले. आंतरराष्ट्रीय समुदायाकडून एवढी मदत येत असली तरीसुद्धा ती पुरेशी नसल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.