शत्रुत्व संपले! आशियातील दोन देशांचे संबंध सर्वसामान्य होतील असा ट्रम्प यांना विश्वास

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 August 2020

खुद्द ट्रम्प यांनीच या करारासंदर्भातील संयुक्त निवेदन प्रसिध्द केले असून त्यामध्ये कोणत्या मुद्यांवर उभय देशांमध्ये मतैक्य झाले याचा तपशील जाहीर करण्यात आला आहे. 

तेलअवीव - मागील अनेक वर्षांपासूनचे शत्रुत्व विसरत इस्राइल आणि संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) आज ऐतिहासिक शांती करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे पश्‍चिम आशियातील या दोन देशांतील संबंध सर्वसामान्य होतील असा विश्‍वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे या दोन देशांतील वादामध्ये ट्रम्प यांनीच मध्यस्थी केली होती. 

या करारासाठी इस्राइलने एक पाऊल माघारी घेतले असून पश्‍चिम किनारपट्टीवरील पॅलिस्टिनी भागावरील हक्क त्यांनी सोडला आहे. हा भाग इस्राइलनेच बळकावल्याचे बोलले जाते. या कराराच्या अनुषंगाने इस्राइल, संयुक्त अरब अमिराती आणि अमेरिकेत प्रदीर्घ अशी बोलणी पार पडली होती. हा करार त्याचीच निष्पत्ती असल्याचे व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. खुद्द ट्रम्प यांनीच या करारासंदर्भातील संयुक्त निवेदन प्रसिध्द केले असून त्यामध्ये कोणत्या मुद्यांवर उभय देशांमध्ये मतैक्य झाले याचा तपशील जाहीर करण्यात आला आहे. 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि अबुधाबीचे राजपुत्र शेख मोहंमद बिन झायेद अल नहायान यांच्यामध्ये दूरध्वनीवरून चर्चा झाल्यानंतर या कराराला मूर्त रूप आले. या करारामुळे इस्राइलशी सक्रिय संबंध ठेवणाऱ्यांमध्ये यूएई हा तिसरा अरब देश बनला आहे. 

नेत्यांचे कौतुक 
या ऐतिहासिक अशा राजनैतिक तोडग्यामुळे पश्‍चिम आशियामध्ये शांतता निर्माण होईल. या कराराचा दस्तावेज धाडसी अशी राजकीय पाऊले आणि तिन्ही देशांच्या नेत्यांची दूरदृष्टी याचा पुरावा आहे, असे या संदर्भातील निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पॅलिस्टिनी अधिकाऱ्यांनी मात्र या करारावर टीका केली आहे. या करारानंतर इस्राइलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी आम्ही यूएईला मदत करू असे म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Historic Peace Agreement between Israel and the United Arab Emirates says trump