
अमेरिकेला आशा; गहू निर्यातबंदीवर भारत फेरविचार करेल
न्यूयॉर्क : गव्हाची निर्यात बंदी करण्याच्या भारताच्या निर्णयानंतर जगभरात गव्हाच्या किमतीमध्ये मोठी वाढ होऊ लागली आहे. निर्यातबंदीचे समर्थन चीनने केले असले तरी या निर्णयावर भारत फेरविचार करेल, अशी आशा अमेरिकेने व्यक्त केली. ज्या देशांनी गव्हाच्या निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे, त्यांना तसे न करण्याचे आवाहन करण्यात येत असल्याचे संयुक्त राष्ट्रांमधील अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉमस ग्रीनफिल्ड यांनी सोमवारी सांगितले. ‘न्यूयॉर्क फॉरेन प्रेस सेंट’मधील पत्रकार परिषदेत जागतिक अन्न सुरक्षेवर बोलत असताना भारताच्या गहू निर्यात बंदीसंबंधी प्रश्न विचारण्यात आला.
त्याला उत्तर देताना ग्रीनफिल्ड म्हणाल्या, भारताच्या निर्णयाचा अहवाल पाहिला आहे. निर्यातीवर प्रतिबंध घालू नयेत, असे आवाहन करीत आहोत. कारण निर्यात रोखली तर अन्नधान्याची टंचाई निर्माण होईल. सुरक्षा समितीमध्ये आमच्या बैठकीत भाग घेणाऱ्या देशांपैकी भारत एक आहे. ’’
चीनचे भारताला समर्थन
भारताच्या या निर्णयावर पाश्चिमात्य देशांनी टीका केली असली तरी चीनने मात्र समर्थन केले आहे. चिनी सरकारचे मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाइम्स’ने प्रसिद्ध केलेल्या एका लेखात ‘अन्न पुरवठा संकटाबद्दल पाश्चिमात्य देशांना चिंता वाटत असेल तर पुरवठा स्थिर ठेवण्यासाठी ते स्वतः निर्यात का वाढवत नाहीत, असा प्रश्न विचारला आहे.