
युद्ध संपवण्यासाठी रशियाला प्रभावित करा; मोदींकडून अपेक्षा
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन दिवसीय युरोप दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये त्यांनी काल डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेड्रिक्सन यांची भेट घेतली. या दोघांमध्ये रशिया युक्रेन युद्धाबाबतच चर्चा झाली. यावेळी फ्रेड्रिक्सन यांनी भारताकडून अपेक्षा व्यक्त केली आहे.
फ्रेड्रिक्सन म्हणाल्या की, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत रशिया युक्रेन युद्धाबद्दल तसंच नागरिकांचा होणारा छळ आणि त्यांना सहन कराव्या लागणाऱ्या त्रासाच्या गंभीर परिणामांबाबत चर्चा केली. युद्ध संपवण्यासाठी भारत रशियाला प्रभावित करू शकेल अशी अपेक्षाही त्यांनी पंतप्रधान मोदींकडे व्यक्त केली आहे.
रशियाच्या युक्रेनमधल्या आक्रमणाचा निषेध करत त्यांनी हे आक्रमण बेकायदेशीर आणि विनाकारण असल्याचं मत व्यक्त केलं. तसंच त्या म्हणाल्या की रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांना मी स्पष्टपणे सांगितलं होतं की तुम्ही हे युद्ध आणि हिंसाचार थांबवा. तर फ्रेड्रिक्सन यांच्यासोबत झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं की युक्रेन प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसंच संवाद आणि सामंजस्याने तात्काळ युद्धविराम आणि या संघर्षावर मार्ग काढण्यात यावा, असंही बोलणं झालं.
आज पुन्हा एकदा दोन्ही पंतप्रधान भारत-नॉर्डिक शिखर परिषदेदरम्यान भेटणार आहेत. यामध्ये स्वीडन, फिनलँड, नॉर्वे आणि आईसलँड हे देशही सहभागी होणार आहेत. ही दुसरी शिखर परिषद ठरणार आहे. याआधीची परिषद २०१८ साली झाली होती.
Web Title: Hope India Influences Russia To End War Pm Modi Is Told
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..