'सच्चा समर्थक कायद्यांना फाट्यावर मारुन हिंसा करु शकत नाही'; ट्रम्प यांचं शांततेचं आवाहन

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 January 2021

कॅपिटल हिंसा प्रकरणी अमेरिकेतील हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हने बुधवारी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव पारित केला गेला आहे. 

वॉशिंग्टन : कॅपिटल हिंसा प्रकरणी अमेरिकेतील हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हने बुधवारी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव पारित केला गेला आहे. त्यांच्या विरोधात हाऊसमध्ये 232 विरोधात 197 मतांनी महाभियोग प्रस्ताव पास झाला. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या राष्ट्राध्यक्षावर दुसऱ्यांदा महाभियोग प्रस्ताव दाखल होण्याची नामुष्की ओढावली आहे.

मात्र, याविषयी बोलताना ट्रम्प यांनी आता सामंजस्याची भुमिका घेत शांततेचे आवाहन केलं आहे. त्यांनी म्हटलंय की, ते हिंसेच्या बाजूने नाहीयेत. त्यांनी लोकांना शांती राखण्याचं आवाहन केलं आहे. ट्रम्प यांनी म्हटलंय की झुंडीची हिंसा त्या सर्व बाबींच्या विरोधात जाते, ज्यावर मी विश्वास ठेवतो. माझा सच्चा समर्थक कधीच राजकीय हिंसा करु शकत नाही, तो कायद्यांना फाट्यावर मारू शकत नाही. जर तुम्ही असं काही कर त असाल तर तुम्ही आमच्या आंदोलनाचं समर्थन करता नाही आहात तर तुम्ही आपल्या देशावरच हल्ला करत आहात.

पुढे त्यांनी म्हटलं की, आम्ही राजकीय हिंसेला हाताबाहेर जाताना पाहिलं आहे. अनेक दंगली पाहिल्या आहेत. झुंड, तोडफोडीच्या घटना पाहिल्या आहेत. हे थांबलं  पाहिजे. मग तुम्ही डावे असाल किंवा उजवे. डेमोक्रॅट असाल किंवा रिपब्लिकन असा. हिंसेचे समर्थन कधीच केलं जाऊ शकत नाही.

ट्रम्प यांनी म्हटलं की, यासाठी कोणताही क्षमा नाहीये. अमेरिका हे कायद्याचे राज्य आहे. मागच्या आठवड्यात ज्यांनी कॅपिटल हिलवर हल्ला केला त्यांना कायद्यांच्या कचाट्यात आणलं जाईल. यासाठी फेडरल एजन्सीला मी कायद्याचे योग्य पालन करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याच्या सुचना दिल्या आहेत. वॉशिंग्टन डिसीमध्ये हजारो नॅशनल गार्ड कर्मचाऱ्यांना आम्ही आणत आहोत जेणेकरुन इथली सुरक्षितता अबाधित राहिल.

मात्र आता कॅपिटल हिंसा प्रकरणी अमेरिकेतील हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हने बुधवारी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव पारित केला गेला आहे.  कॅपिटल हिल हिंसाचारात 5 जणांचा मृत्यू झाला होता. प्रतिनिधिगृहाने महाभियोगाची कारवाई सुरू करण्यापूर्वी उपाध्यक्ष माईक पेन्स यांना पंचविसाव्या घटना दुरुस्तीनुसार अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची गच्छंती करण्यास सांगितले आहे. याबाबतचा ठराव 223 विरुद्ध 205 मतांनी मंजूर झाला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: impeachment of US President Donald Trump says No true supporter of mine could ever endorse political violence