
Imran Khan : लष्कराच्या मुख्यालयावर झालेल्या हल्ला प्रकरणात इम्रान खान यांना जामीन
लाहोर : लष्कराच्या मुख्यालयावर झालेल्या हल्ला प्रकरणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना आज जामीन मिळाला. इम्रान यांना नऊ मे रोजी अटक झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी प्रचंड हिंसाचार करताना लाहोर आणि रावळपिंडी येथील लष्करी मुख्यालयांवर हल्ले केले होते. त्यावरून इम्रान यांच्याविरोधातही गुन्हा नोंदविण्यात आला होता.
इम्रान हे आज खासगी सुरक्षा रक्षकांच्या कडेकोट बंदोबस्तात येथील उच्च न्यायालयात हजर झाले. सुनावणीदरम्यान इम्रान यांनी त्यांच्यावरील आरोप नाकारले. हिंसाचार आपल्या समर्थकांनी केलाच नाही आणि लष्करी मुख्यालयावर हल्ला झाला त्यावेळी मी पोलिसांच्या ताब्यात होतो, असे इम्रान यांनी सांगितले.
आपल्यावर राजकीय सूडातून आरोप करण्यात आले असल्याचा दावाही इम्रान यांनी केला. यानंतर इम्रान यांना वैयक्तिक जातमुचलक्यावर दोन जूनपर्यंत जामीन मंजूर करण्यात आला.
कडेकोट बंदोबस्त
इम्रान यांनी वारंवार जीवाला धोका असण्याची भीती व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर आज ते खासगी सुरक्षा रक्षकांच्या कडेकोट बंदोबस्तात लाहोर उच्च न्यायालयात दाखल झाले. त्यांच्या भोवती सुरक्षा रक्षकांचे कडे होतेच, शिवाय डोक्यावर कोणी गोळी मारू नये म्हणून विशेष कवच त्यांच्या चेहऱ्याभोवती धरण्यात आले होते.
इम्रानसमर्थक पत्रकार घरी परतला
इस्लामाबाद : मागील आठवड्यापासून बेपत्ता झालेला पाकिस्तानी वाहिनीचा पत्रकार आज त्याच्या घरी परतला. सामी अब्राहम असे या पत्रकाराचे नाव आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांना समर्थन दिल्यामुळेच सामी यांचे अपहरण झाल्याचा दावा केला जात आहे.
मागील आठवड्यात कामावरून घरी परतत असताना चार दुचाकींवरून आलेल्या व्यक्तींनी त्यांची मोटार रस्त्यात अडविली होती. त्यानंतर ते बेपत्ता झाले होते. सामी बेपत्ता झाल्यापासून अनेक जणांनी सोशल मीडियावर सरकारवर टीका केली होती. इम्रान यांना समर्थन असणारा इम्रान रियाझ हा आणखी एक पत्रकार मागील एक महिन्यापासून बेपत्ता आहे.