
'पाकिस्तान आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या महागाईत बुडाला आहे. जगासमोर आपल्या देशाचा अपमान होत आहे.'
Imran Khan : भारतातील मीडिया बघा, तेही आमचा अपमान करताहेत; अटकेआधी काय म्हणाले इम्रान?
लाहोर : माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान (Pakistan) तहरीक-ए-इन्साफचे प्रमुख इम्रान खान (Imran Khan) यांनी त्यांना अटक होण्याआधी समर्थकांना संबोधित केलंय.
इम्रान यांना कधीही अटक होऊ शकते, असं सांगण्यात येत आहे. इम्रान यांनी आपल्या भाषणात बेधडकपणे इशारा दिला आहे. आपण स्वत: कोणाच्याही पुढं झुकलो नाही आणि आपल्या समर्थकांनाही कोणापुढं झुकू देणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय.
इम्रान आपल्या भाषणात म्हणाले, 'ना मी कुणासमोर झुकलो आहे, ना तुम्हाला झुकू देणार आहे. या चोर-डाकूंनी पाकिस्तानला कुठं नेऊन ठेवलंय? जो समाज गुलाम आहे, तो कधीही स्पर्धा करू शकत नाही. केवळ स्वतंत्र समुदायच स्पर्धा करू शकतो. आपल्या भाषणादरम्यान इम्रान यांनी नवाझ शरीफ (Nawaz Sharif) आणि शेहबाज शरीफ यांच्यावरही जोरदार निशाणा साधला.
इम्रान पुढं म्हणाले, 'पाकिस्तान आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या महागाईत बुडाला आहे. जगासमोर आपल्या देशाचा अपमान होत आहे. भारतातील मीडिया बघा, तेही आमचा अपमान करत आहेत. पाकिस्तानमधील आर्थिक संकटावर बोलल्यानंतर इम्रान यांनी नवाझ शरीफ यांच्यावरही निशाणा साधला. देशाचा पैसा चोरून शरीफ अरबांच्या घरात बसले आहेत, लंडनमध्ये बसून देश चालवत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.
तोशाखाना प्रकरणी कारवाई सुरू
तोशाखाना प्रकरणी पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे प्रमुख इम्रान खान यांना अटक करण्यासाठी पोलीस अटक वॉरंट घेऊन लाहोरला पोहोचले आहेत. खान यांच्याविरुद्ध जिल्हा न्यायालयानं अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे.