काश्मीरप्रश्नी कोणत्याही थराला जाऊ, अणुयुद्धही करू : इम्रान खान

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

''जगातील महाशक्ती आणि व मुस्लिम देशही पाकिस्तानला साथ देत नाहीत. मात्र, यामागे त्यांची अपरिहार्यता असली तरी बदलत्या काळानुसार हे देश त्यांच्याबरोबर असतील, असे आश्‍वासन देत तुम्ही निराश होऊ नका, आपण संपूर्ण जगात काश्‍मीरचे प्रतिनिधित्व करू''

इस्लामाबाद : "काश्‍मीरप्रश्‍नी आपण कोणत्याही थराला जाऊ शकतो,'' अशी दर्पोक्ती करीत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अणुयुद्घाची धमकी सोमवारी दिली. 

काश्‍मीरप्रश्‍नी 370 वे कलम हटविल्यानंतर पाकिस्तानमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. संयुक्त राष्ट्रापासून मुस्लिम देशांच्या दारात जाऊनही पदरी निराशाच पडली आहे. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या "जी-7' परिषदेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चर्चा झाली. त्यात काश्‍मीरप्रश्‍न द्विपक्षीय असल्याचे मान्य करीत ट्रम्प यांनी मोदींवर विश्‍वास व्यक्त केला. यानंतर काही वेळातच इम्रान खान यांनी पाकिस्तानी जनतेला उद्देशून भाषण केले. त्या वेळी जगात एकाकी पडल्याने निर्माण झालेली निराशा त्यांच्या भाषणातून जाणवत होती.

"जगातील महाशक्ती आणि व मुस्लिम देशही पाकिस्तानला साथ देत नाहीत. मात्र, यामागे त्यांची अपरिहार्यता असली तरी बदलत्या काळानुसार हे देश त्यांच्याबरोबर असतील, असे आश्‍वासन देत तुम्ही निराश होऊ नका, आपण संपूर्ण जगात काश्‍मीरचे प्रतिनिधित्व करू. मी 27 सप्टेंबरला हा मुद्दा यूएनमध्ये उपस्थित करणार आहे, असे इम्रान खान यांनी जनतेला सांगितले. 

यूएनमध्ये काश्‍मीरचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर पाकिस्तानला मार खावा लागला होता. त्यावर बोलताना इम्रान खान यांनी ""दुर्बलांना साथ देणे ही "यूएन'ची जबाबदारी आहे; पण ते कायमच प्रबळ देशांनाच पाठिंबा देतात,'' असे सांगत हतबलता व्यक्त केली. त्याचबरोबरच अण्वस्त्रांची धमकीही दिली. "दोन्ही बाजूंकडे अण्वस्त्रे आहेत. जर युद्ध झाले तर दोन्ही देशांबरोबरच संपूर्ण जगाचा नाश होईल, अशी दर्पोक्ती करीत "आम्ही काश्‍मीरसाठी काहीही करू शकतो,' असे ते म्हणाले. 

इम्रान यांनी या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीकेची झोड उठविली. भाषणाच्या सुरवातीलाच संघाला लक्ष्य करीत आधीच्या राजवटीतही "आरएसएस'वर दहशत फैलावत असल्याचा आरोप करण्यात आला होता, असे त्यांनी सांगितले. 

इम्रान खान यांचे बोल 
- काश्‍मीरमधील 370 वे कलम हटविणे ही मोदी यांची चूक 
- या निर्णयाने काश्‍मीरकडे जगाचे लक्ष वेधले अन्‌ मुद्दा आंतरराष्ट्रीय बनला 
- काश्‍मिरी जनतेला विश्‍वास देण्यासाठी देशभरात प्रत्येक आठवड्याला कार्यक्रम हाती घेणार 
- यात शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयातील कर्मचारी सहभागी होतील. 
- याची सुरवात शुक्रवारी (ता.30) दुपारी 12 वाजता होणार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Imran Khan warns India about nuclear war in respect to Kashmir issue