कार्बनच्या उत्सर्जनात १.७ टक्क्यांनी वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

increase in carbon emissions demand for natural gas Environment

कार्बनच्या उत्सर्जनात १.७ टक्क्यांनी वाढ

शर्म एल-शेख (इजिप्त) : कोळशाचा अद्याप कायम असलेला वापर, तसेच पेट्रोलियम पदार्थ आणि नैसर्गिक वायूची वाढती मागणी यामुळे तापमानवाढीस कारणीभूत असणाऱ्या कार्बन डाय ऑक्साइड वायूच्या उत्सर्जनात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १.७ टक्क्यांची भर पडली आहे. तापमानवाढ रोखण्यासाठी जगभरात विचारमंथन सुरु असतानाच हे वास्तव समोर आल्याने चिंता व्यक्त होत आहे. कार्बन डाय ऑक्साइडचे सर्वाधिक उत्सर्जन करणारा देश असलेल्या चीनमधून मात्र २०२१ च्या तुलनेत ०.९ टक्के उत्सर्जन कमी झाले आहे, तर अमेरिकेमधून १.५ टक्के उत्सर्जन अधिक झाले आहे.

‘ग्लोबल कार्बन प्रोजेक्ट’ या कार्बन उत्सर्जनाची नोंद ठेवणाऱ्या संस्थेने या वर्षीसाठीचा आपला अहवाल इजिप्तमध्ये सुरु असलेल्या हवामान बदल परिषदेत प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, जगातील कार्बनच्या प्रदूषणात सातत्याने वाढ होत असली तरी १५ वर्षांपूर्वी ते ज्या वेगाने वाढत होते, तितका वेग सध्या नाही. मात्र, तरीही हवेतील कार्बनचे प्रमाण वाढतच असल्याने आणि ते तापमानवाढीला कारणीभूत ठरत असल्याने ही चिंतेची बाब असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांनी स्पष्ट केले. ही स्थिती कायम राहिल्यास त्याचा सामना करणे मानवाला दिवसेंदिवस अवघड जाईल, असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे.

महत्त्वाची निरीक्षणे

  • २०२२ वर्षांत ३६.६ अब्ज दशलक्ष टन कार्बन उत्सर्जन

  • जागतिक उत्सर्जनात १.७ टक्के वाढ

  • भारतातील उत्सर्जनात सहा टक्के वाढ

  • युरोपमधील उत्सर्जनात ०.८ टक्के घट

  • कोळशामुळे होणाऱ्या प्रदूषणात एक टक्क्याची वाढ

  • तेलामुळे होणाऱ्या प्रदूषणात दोन टक्क्यांची वाढ

सावधानतेचा इशारा

तीव्र तापमान टाळण्यासाठी जागतिक सरासरी तापमानवाढ औद्योगिकीकरणपूर्व कालावधीच्या तुलनेत १.५ अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्याचे उद्दीष्ट पॅरिस येथील परिषदेत निश्‍चित करण्यात आले होते. पृथ्वीच्या वातावरणात आणखी ३८० अब्ज दशलक्ष टन कार्बन डाय ऑक्साइड सोडल्यास १.५ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला जाईल. कार्बन डाय ऑक्साइड हवेत मिसळला जाण्याचे सध्याचे प्रमाण पाहता, पुढील नऊ ते १० वर्षांमध्ये इतक्या प्रमाणात कार्बन हवेत मिसळला जाईल. म्हणजेच, २०३१ किंवा २०३२ या वर्षापर्यंत तापमानात मोठी वाढ होऊ शकते. हे टाळण्यासाठी २०३० पर्यंत उत्सर्जनात निम्म्याने घट आवश्‍यक आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.

संसर्गस्थितीचा परिणाम

अमेरिका आणि चीन हे कार्बन डाय ऑक्साइडचे सर्वाधिक उत्सर्जन करणारे देश आहेत. २०२१ पर्यंत चीनमधील कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण दरवर्षी वाढते होते, तर अमेरिकेतील प्रमाण घटत होते. या वर्षी मात्र परिस्थिती उलट झाल्याचे दिसून आले आहे. संसर्ग स्थितीतून बाहेर पडल्यानंतर वाढलेल्या घडामोडींचा आणि युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्जासंकटाचा परिणाम या देशांमधील बदलांवर दिसून आला असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले.