चीनमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ; आरोग्य कर्मचाऱ्यांनाही लागण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus in China

झिरो कोरोना धोरणाच्या विरोधात तीव्र आंदोलन झाल्याने चीन सरकारने लॉकडाउन मागे घेतला खरा, पण आता स्थिती ढासळत असल्याचे चित्र आहे.

Coronavirus : चीनमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ; आरोग्य कर्मचाऱ्यांनाही लागण

बीजिंग - झिरो कोरोना धोरणाच्या विरोधात तीव्र आंदोलन झाल्याने चीन सरकारने लॉकडाउन मागे घेतला खरा, पण आता स्थिती ढासळत असल्याचे चित्र आहे. बीजिंगसह अन्य शहरातील रुग्णालयात कोरेानाबाधितांची संख्या वाढत चालली असून वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टरना देखील कोरोनाची लागण होत आहे. कोरोनाबाधित होऊनही ते रुग्णांवर उपचार करत आहेत.

कोरोना रोखण्यासाठी चीनने झीरो कोरोना धोरण राबविले. मात्र बाह्यशक्तीने चिथावणी दिल्याने लोकांनी सरकारविरुद्ध आंदोलन केले आणि हे धोरण मागे घेण्यास भाग पडले. त्यामुळे आता कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली, असे चीनच्या अधिकाऱ्यांनी आरोप केला आहे. बीजिंगच्या रुग्णालयाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यात बीजिंगसह अन्य शहरातील रुग्णालये रुग्णांनी खचाखच भरलेले दिसतात. तसेच उपचारासाठी रुग्णालयाबाहेर कडाक्याच्या थंडीत रुग्णांना कुडकुडत उपचारासाठी वाट पाहावी लागत असल्याचे दिसते.

काही व्हिडिओत रुग्णालयाच्या वाहतनतळात उभ्या असलेल्या मोटारीतच काही रुग्ण आयव्ही अडकवून उपचार घेताना दिसून येतात. यादरम्यान तब्बल दोन वर्षे कोरोना रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू करणाऱ्या चीन सरकारने आता घुमजाव करत ओमिक्रॉन हा धोकादायक नसल्याचे म्हटले आहे. नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी असा सल्ला दिला आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार गेल्या चोवीस तासांत चीनमध्ये २२९१ रुग्णांची भर पडल्याचे म्हटले आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना

चीनच्या सरकारने लॉकडाउन मागे घेतल्याचा भूर्दंड आरोग्य कर्मचाऱ्यांना भोगावा लागत आहे. रुग्णालयात कोरोनाबाधितांची रांग लागली आहे. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना देखील बाधा होत आहे. एका वैद्यकीय कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, कोरोना पॉझिटिव्ह असतानाही आमच्याकडून काम करून घेतले जात आहे.

दररोज तीस हजार कॉल

बीजिंग येथील स्थानिक मेडिकल इमरजन्सीच्या हेल्पक्रमांकावर दररोज ३० हजारापेक्षा कॉल येत असून ते मदतीची मागणी करत असल्याचे म्हटले आहे. शिचुआन प्रांतातील स्थिती खराब असून तेथे दररोज ७०० ते ८०० जणांना तापेची समस्या होत आहे. चेंगडू शहरातील रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिकेने आपण दररोज २०० रुग्णांवर उपचार करत असल्याचे सांगितले. तज्ज्ञांच्या मते, कोरोना निर्बंध शिथिल केल्यामुळेच रुग्णांची संख्या वाढली आहे. अनेक रुग्णालयातील औषधी देखील संपली आहेत.