चीनच्या ताकदीत समतोल साधण्यासाठी भारताने अन्य देशांची भागीदारी करणे गरजेचे: गौतम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चीनच्या ताकदीत समतोल साधण्यासाठी भारताने अन्य देशांची भागीदारी करणे गरजेचे: गौतम

चीनच्या ताकदीत समतोल साधण्यासाठी भारताने अन्य देशांची भागीदारी करणे गरजेचे: गौतम

पुणे: ‘‘पूर्व लडाखमधील सीमारेषेवर सुरू असलेल्या तणावामुळे भारत-चीनमधील संबंधांवर परिणाम झाला आहे. भारताने चीनसमेवत असणाऱ्या व्यापारावर निर्बंध घातले आहेत. भारतात व्यापार करण्यासंदर्भातील नियम आणि कायदेशीरबाबींमुळे चीनमधील अनेक कंपन्या अडचणीत आल्या आहेत. आगामी काळातही भारताने चीनमधील उत्पादनांवर अवलंबून असणे कमी करायला हवे. चीनच्या ताकदीत समतोल साधण्यासाठी भारताने अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि अन्य देशांसमवेत भागीदारी करणे गरजेचे ठरेल,’’ असे मत चीनमधील माजी भारतीय राजदूत गौतम बंबावले यांनी व्यक्त केले.

पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या वतीने ‘अंडरस्टॅंडिंग गलवान टू गॅलवनाइज् इंडिया’ विषयावर बंबावले यांचे व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी ते बोलत होते. बंबावले म्हणाले, ‘‘पूर्व लडाखमधील सीमारेषेवर अशांतता असेपर्यंत चीनसमवेत व्यापार आणि अन्य देवाण-घेवाण नसेल, अशी भारताची सध्याची भूमिका आहे. तर अगदी याउलट चीनची भूमिका आहे. ‘सीमारेषेवरील तणाव आणि व्यापार देवाण-घेवाण हे दोन्ही वेगवेगळे विषय आहेत’, असे चीनचे म्हणणे आहे.

परंतु आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहोत. पूर्व लडाखमध्ये २०२०पासून सुरू झालेल्या तणावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करता भारताने त्यादृष्टीने धोरणात्मक पावले यापूर्वीच उचलली आहेत. भारतात झालेल्या ‘फाईव्ह जी’च्या चाचणीत केंद्र सरकारने चीनमधील कंपन्यांवर बंधने लादली होती. परंतु आगामी काळातही चीनसोबत असणाऱ्या व्यापारी संबंध मर्यादित ठेवून त्याला पर्याय म्हणून अन्य देशांशी भागीदारी वाढविण्यावर भर द्यायला हवा.’’

‘‘केवळ आशियामध्येच नव्हे तर संपूर्ण जगात आपण ‘सुपर पॉवर’ असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न चीन करत आहे. जागतिक पातळीवरील अमेरिकेच्या वर्चस्वाला धक्का देऊन स्वत:चे वर्चस्व सिद्ध करण्याची स्पर्धा चीनद्वारे सुरू आहे,’’ असेही बंबावले यांनी अधोरेखित केले.

‘‘जगात आगामी काळात रशिया-युक्रेन युद्ध नसेल, तर अमेरिका आणि चीन यांच्यात वर्चस्व सिद्ध करण्याची स्पर्धा ही मोठी असेल. ही स्पर्धा काही वर्षांपुरती मर्यादित नसेल. तर ही स्पर्धा जवळपास ३० ते ४० वर्ष म्हणजेच जवळपास तीन ते चार दशके चालणारी असेल. हा जगातील भौगोलिक राजकारणाचा ‘हॉलमार्क’ असणार आहे.’’

- गौतम बंबावले, चीनमधील माजी भारतीय राजदूत

टॅग्स :ChinaIndiaamerica