
भारत-पाकिस्तान संघर्ष टिपेला पोहोचलेला असताना दोन्ही देशांकडून तात्काळ युद्धविराम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. मागील ४८ तासांत अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो आणि उपराष्ट्रपती जे. डी. व्हॅन्स यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ, तसेच दोन्ही देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि लष्करी अधिकारी यांच्याशी उच्चस्तरीय चर्चा केली.
या चर्चांनंतर, भारत आणि पाकिस्तान सरकारने तात्काळ शस्त्रसंधीवर (Ceasefire) सहमती दर्शवली असून, विविध मुद्द्यांवर पुढील चर्चा "तटस्थ स्थळी" करण्यासही मान्यता दिली आहे.
मार्को रुबियो यांचा ट्विटमधून मोठा खुलासा
रुबियो यांनी आपल्या अधिकृत @SecRubio ट्विटर हँडलवरून या संदर्भात ट्विट करत सांगितले की , "मागील ४८ तासांमध्ये, उपराष्ट्रपती व्हॅन्स आणि मी भारताचे आणि पाकिस्तानचे उच्चपदस्थ अधिकारी, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शहबाज शरीफ, परराष्ट्र मंत्री सुब्रह्मण्यम जयशंकर, लष्करप्रमुख असीम मुनीर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि असीम मलिक यांचा समावेश आहे, यांच्याशी चर्चा केली.
मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की भारत आणि पाकिस्तानच्या सरकारांनी तात्काळ शस्त्रसंधी आणि एका तटस्थ ठिकाणी विस्तृत मुद्द्यांवर चर्चा सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे. शांततेचा मार्ग निवडल्याबद्दल आम्ही पंतप्रधान मोदी आणि शरीफ यांच्या बुद्धीमत्तेचे, दूरदृष्टीचे आणि मुत्सद्देगिरीचे कौतुक करतो.