अंतर्गत बाबींत हस्तक्षेप अमान्य

पीटीआय
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

'जम्मू-काश्‍मीरचा विशेष दर्जा काढून घेणे हा भारताचा सार्वभौम निर्णय आहे. भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये कोणाचाही हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही,'' असे भारताने आज स्पष्ट केले; तसेच जम्मू-काश्‍मीरबाबत पाकिस्तान खोट्यानाट्या गोष्टी पसरवत आहे. दहशतवादाला खतपाणी घालण्याच्या कृत्याचा आम्ही निषेध करतो, असेही भारताने ठणकावून सांगितले.

भारताचे संयुक्त राष्ट्रांत प्रतिपादन; पाककडूनच मानवी हक्कांची पायमल्ली
जीनिव्हा - 'जम्मू-काश्‍मीरचा विशेष दर्जा काढून घेणे हा भारताचा सार्वभौम निर्णय आहे. भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये कोणाचाही हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही,'' असे भारताने आज स्पष्ट केले; तसेच जम्मू-काश्‍मीरबाबत पाकिस्तान खोट्यानाट्या गोष्टी पसरवत आहे. दहशतवादाला खतपाणी घालण्याच्या कृत्याचा आम्ही निषेध करतो, असेही भारताने ठणकावून सांगितले.

संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क परिषदेत जम्मू-काश्‍मीरचा मुद्दा उपस्थित करून खोट्या आरोपांचा सपाटा लावला होता. त्याला भारताने सडेतोड उत्तर दिले. "मानवी हक्‍क्‍यांच्या पायमल्लीचा उल्लेख जे करत आहेत, ते आपल्या स्वतःच्या देशात मानवी हक्‍कांना पायदळी तुडवत आहेत. दहशतवादाला बळी पडल्याचे ढोंग ते करत आहेत, वास्तविकतः तेच दहशतवाद पसरवत आहेत,' असा सणसणीत टोला भारतातर्फे बोलताना परराष्ट्र खात्यातील पूर्व विभागाच्या सचिव विजय ठाकूर सिंह यांनी पाकिस्तानचा स्पष्ट संदर्भ देत हाणला. पाकिस्तानने केलेले सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले.

हक्क परिषदेचे अध्यक्ष मायकेल बॅचलेट यांनी सोमवारी जम्मू-काश्‍मीरमधील स्थितीबाबत चिंता व्यक्त केली होती आणि तेथील निर्बंध शिथिल करण्यात यावेत, असा उल्लेख केला होता. त्या वक्तव्याचा संदर्भ घेत सिंह म्हणाल्या, 'जम्मू-काश्‍मीरबाबत भारताने नुकतेच घेतलेले निर्णय हे घटनेच्या चौकटीतच आहेत. याबाबत भारताच्या संसदेमध्ये चर्चाही झाली. त्याचे थेट प्रक्षेपणही करण्यात आले होते. संसदेने त्याबाबतचे विधेयकही मंजूर केले. आपल्या देशाच्या अंतर्गत कारभारात इतर कोणताही देश हस्तक्षेप खपवून घेणार नाही, भारत तर नक्कीच नाही.''

'आव्हानात्मक परिस्थिती असूनही मूलभूत सेवा, अत्यावश्‍यक गोष्टींचा पुरवठा, संस्थांचे सुरळीत संचालन, जवळजवळ संपूर्ण भागात संपर्क यंत्रणा जम्मू-काश्‍मीरमधील प्रशासनाने कार्यान्वित केली आहे. लोकशाही पद्धतीने सर्व प्रक्रिया सुरू आहेत. निर्बंध हळूहळू दूर केले जात आहेत. सीमेपलीकडून पसरविल्या जात असलेल्या दहशतवादापासून आमच्या नागरिकांना वाचविण्यासाठी, त्यांच्या सुरक्षिततेसाठी तात्पुरते निर्बंध आवश्‍यक होते,'' असे सिंह म्हणाल्या.

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांच्या वक्तव्याचा संदर्भ घेत त्या म्हणाल्या, 'एका शिष्टमंडळाने अलंकारिक शब्दांचा वापर करून माझ्या देशावर खोटे व वाट्टेल ते आरोप केले. दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या व दहशतवादाचे जागतिक केंद्र असलेल्या भागातून हे खोटे आरोप केले जात असल्याचे साऱ्या जगाला माहिती आहे. या दहशतवादाचा संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायालाच धोका आहे. दहशतवादाला खतपाणी घालणारे, त्यांचा आर्थिक मदत करणारेच खरे मानवी हक्कांची पायमल्ली करत आहेत.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India Pakistan Jammu Kashmir Issue United Nations