भारत-अमेरिका चर्चेला अखेर मिळाला मुहूर्त ; 6 सप्टेंबरला होणार 'टू प्लस टू'

पीटीआय
शनिवार, 21 जुलै 2018

"टू प्लस टू' चर्चेत द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवर भर दिला जाईल. दोन्ही देशांदरम्यान राजनैतिक आणि सुरक्षा संबंध मजबूत करण्यासंदर्भात चर्चा केली जाईल. 

- रवीश कुमार, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते 

वॉशिंग्टन : दीर्घ प्रतीक्षा आणि वारंवार तारीख निश्‍चित करण्याच्या धडपडीनंतर अखेर भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यानची पहिली "टू प्लस टू' चर्चा 6 सप्टेंबरला नवी दिल्ली येथे होणार असल्याचे निश्‍चित झाले. 

अमेरिकेने अपरिहार्य कारणांचा हवाला देताना मागील महिन्यात ही चर्चा स्थगिती केली होती. "टू प्लस टू'मध्ये भारत आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री तसेच संरक्षणमंत्र्यांदरम्यान थेट चर्चा होईल. या चर्चेत भाग घेण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ आणि संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस सहा सप्टेंबरला नवी दिल्लीला जातील, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हीथर नोर्ट यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

हिंद महासागर क्षेत्रासह अन्य क्षेत्रांतील आव्हानांचा सामना करण्यासाठी अमेरिका-भारत यांच्यातील भागीदारीच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेचे मंत्री भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी राजनैतिक, सुरक्षा आणि संरक्षण सहकार्य मजबूत करण्यावर चर्चा करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India US talks finally reached On 6th September To Plus Two