भारत जगातील चौथी महासत्ता होईल -  हिराबायाशी

भारत जगातील चौथी महासत्ता होईल -  हिराबायाशी

टोकियो (जपान)  - ""जपान व भारत यांचे संबंध दिवसेंदिवस अधिक दृढ होत आहेत. एक बलवान राष्ट्र म्हणून भारत आगेकूच करीत आहे. लवकरच अमेरिका, रशिया व चीन यांच्यानंतर आता भारत जगातील चौथी महासत्ता बनेल,'' असे प्रतिपादन जपानचे भारतातील माजी राजदूत व जपान इंडिया असोसिएशनचे अध्यक्ष हिरोशी हिराबायाशी यांनी केले. 

सकाळ माध्यम समूहाच्या पुढाकाराने येथे दोन दिवसांपासून सुरू असलेल्या "एज्युकॉन 2019' या शिक्षणविषयक परिषदेचा समारोप आज हिराबायाशी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. "सकाळ माध्यम समूहा'चे अध्यक्ष प्रतापराव पवार अध्यक्षस्थानी होते. 

हिराबायाशी यांनी जपान व भारतातील संबंधांचे सविस्तरपणे विवेचन केले. ते म्हणाले, ""जपान आता व्हिएतनाम, कंबोडिया, कोरिया या देशांप्रमाणे भारताशीही घनिष्ट मैत्री करू शकतो. "इंडो पॅसिफिक रिम'मध्ये एका बाजूला जपान हे आर्थिक राष्ट्र असून, दुसऱ्या बाजूला भारत हे बलवान राष्ट्र म्हणून पुढे येत आहे, हे त्यामागचे प्रमुख कारण आहे.'' 

भारतीयांना जपानमध्ये नोकरी, व्यवसाय व शिक्षणाच्या उपलब्ध संधींबाबतही हिराबायाशी यांनी माहिती दिली. चीनच्या वाढत्या हालचालींचाही हिराबायाशी यांनी ऊहापोह केला. याबाबत समविचारी राष्ट्र एकत्र येत आहेत. अशा परिस्थितीत गरज पडल्यास जपान भारताच्या बाजूने उभा राहील, असे सूतोवाचही त्यांनी केले. 

जपानच्या पंतप्रधानांचे सल्लागार संजीव सिन्हा व उद्योजक सुनील कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. या दोघांनीही जपानमध्ये गेल्या दहा-वीस वर्षांच्या वास्तव्याच्या कालावधीत स्वत:चे उद्योग सुरू केले आहेत. जपानची संस्कृती, रीतिरिवाज, जपानमधील करिअरच्या संधी, यांबाबत त्यांनी माहिती दिली. 

कानपूर आयआयटीचे माजी संचालक डॉ. संजय धांडे यांनी, ""कौशल्य व शिक्षण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्यामुळे कौशल्य आत्मसात करण्याची प्रवृत्ती शिक्षण क्षेत्रात वाढण्याची नितांत गरज आहे,'' असे सांगितले. जपानसारखे राष्ट्र प्रगत होण्याचे मुख्य कारण शिक्षण व कलेचा संगम हे आहे, असे ते म्हणाले. धांडे यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कौशल्यांची माहिती, सप्तपदीची उपमा देत समजावून सांगितली. 

महाराष्ट्र सरकारच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी हिवरेबाजार गावात राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. ""वनसंवर्धन, मृदसंवर्धन, जलसंवर्धन व पशुसंवर्धन या चतु:सूत्रीच्या जोडीला मानवाचा सहभाग हवा. याच धर्तीवर पुढील शिक्षणाची दिशा निश्‍चित करण्याची गरज आहे, अन्यथा कालांतराने फक्त रोबोच भूतलावर शिल्लक राहतील,'' असे पवार यांनी स्पष्ट केले. 

अवकाश व डिजिटल सायबरलाही सहकार्य 
भारतातील मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन व मुंबई- दिल्ली इंडस्ट्रिअल कॉरिडॉर या दोन महत्त्वाच्या प्रकल्पांना जपानचे आर्थिक साह्य असल्याचे हिराबायाशी यांनी सांगितले. अवकाश तसेच डिजिटल सायबर टेक्‍नॉलॉजीच्या क्षेत्रात भारत प्रगती करू इच्छित आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठी भारताला सहकार्य करण्याची जपानची इच्छा आहे, असे हिराबायाशी यांनी स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com