
Farmer : कर्जबाजारी भारतीय शेतकरी नोकरीसाठी पोहचला UAE मध्ये अन्...
Indian Farmer In UAE : लॉटरी ही अशी गोष्ट आहे जी कधीही कोणत्याही व्यक्तीचे नशीब बदलू शकते. असाच काहीसा प्रकार दुबईत काम करणाऱ्या एका भारतीय शेतकऱ्यासोबत घडला. हा शेतकरी दुबईत त्याच्यावर असणारे कर्ज फेडण्यासाटी नोकरी करत होता.
गल्फ न्यूजच्या रिपोर्टनुसार, थिनाकर नावाच्या व्यक्तीने संयुक्त अरब अमिरातीच्या 57 व्या साप्ताहिक लाइव्ह महजूज ड्रॉमध्ये 10 दशलक्ष दीरहमचे बक्षीस जिंकले आहे. जर ही रक्कम भारतीय चलनात रूपांतरित केली तर ती अंदाजे 20,23,90,155 रुपये इतकी आहे. थिनाकर फुजैरा युएईमध्ये गवंडी म्हणून काम करतो. मात्र, आता थेट थिनाकरला लॉटरी लागल्याने त्याचे नशीब बदलेले आहे.
कर्ज फेडण्यासाठी दुबईत आला होता
कुटुंबावर असलेली कर्जाची रक्कम फेडण्यासाठी थिनाकर दोन वर्षांपूर्वी यूएईला गेला होता. येथे त्याने त्याच्या सोबत राहणाऱ्या मित्रांना अनेकदा लॉटरी खेळताना पाहिले होते. त्यानंतर थिनाकर यानेदेखील लॉटरीची खेळण्यास सुरूवात केली. त्यात आता त्याचा नंबर लागला असून त्याला 10 दशलक्ष दीरहमची लॉटरी लागली आहे. माझ्या आजी-आजोबांच्या आशीर्वादाने मला हे पैसे माझ्या कुटुंबाला वाचवण्यासाठी संजीवनी म्हणून मिळाल्याचे थिनाकर म्हणाला.
एवढ्या पैशांचं काय करणार?
लॉटरी जिंकल्यानंतर जेव्हा थिनाकरला विचारण्यात आले की, एवढ्या पैशांचे काय करणार. तेव्हा त्याने सांगितले की, सर्वात आधी कुटुंबावर असलेले कर्ज फेडणार आहे. त्यानंतर त्याने जिंकलेल्या पैशांपैकी काही रक्कम त्याच्या गावातील शाळेतील सुविधा सुधारण्यासाठी वापरण्याची योजना आहे.