भारतीय 'कर्णा'चा पाकिस्तानमध्ये दानशूरपणा...

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 जून 2019

जोगिंदर सिंह सलारिया यांनी शत्रूराष्ट्र म्हणून न पाहता माणूसकीच्या नात्याने मदत करण्याचा निर्णय घेतला.

दुबई : भारत-पाकिस्तान म्हटले की सर्वांत प्रथम कट्टर शत्रू म्हणून दोन्ही देश डोळ्यासमोर उभे राहतात. परंतु, यापलीकडे असते ती माणूसकी. भारतीय 'कर्णा'ने पाकिस्तानमध्ये दानशूरपणा केला आहे. या 'कर्णा'च्या ऋणात पाकिस्तानी नागरिक राहणे पसंत करत आहेत.

जोगिंदरसिंह सलारिया यांचे दुबईमध्ये वास्तव्य आहे. पाकिस्तानच्या दक्षिण-पूर्व सिंध प्रांतात पाण्याची दुरावस्था आहे. नागरिकांना दहा-दहा किलोमीटरवरून पाणी आणावे लागते. पाण्यासाठी नागरिकांची वणवण होत होती. जोगिंदर सिंह सलारिया यांना सोशल मीडियावरून याबाबतची माहिती मिळाली होती. जोगिंदर सिंह सलारिया यांनी शत्रूराष्ट्र म्हणून न पाहता माणूसकीच्या नात्याने मदत करण्याचा निर्णय घेतला. सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने त्यांनी एक-दोन नव्हे तर तब्बल 62 बोअरवेल त्या ठिकाणी घेतले आहे. हातपंप बसून पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. शिवाय, अन्नधान्य न मिळणाऱया नागरिकांना अन्नधान्यही दान केले आहे. पाकिस्तानमधील नागरिकांनी पाणी उपलब्ध झाल्यामुळे जोगिंदर सिंह सलारिया यांचे आभार मानले आहेत. पाकिस्तानमध्ये एका भारतीयाने याचा वेगळाच आदर्श घालून दिला आहे.

सलारिया म्हणाले, 'भेल खांगर या सामाजिक कार्यकर्त्याच्या माध्यमातून माहिती मिळाली होती. दक्षिण-पूर्व सिंध प्रांताची अत्यंत दुरावस्था आहे. खूप गरिबी आहे. तेथील नागरिकांना रुग्णालयात जाण्यासाठी 25 ते 50 कि.मी. चालत जावे लागते. शाळांची दुरावस्था असून, अनेक मुले शाळेतच जात नाहीत. अन्न-पाण्यावाचून नागरिकांचे मोठे हाल होताना पाहिले आहेत.'

दरम्यान, सलारिया हे 1993 पासून संयुक्त अरब अमीरात येथे राहत आहेत. ते परिवहन व्यवसायाशी संबंधित आहेत. ते फेसबुक आणि यूट्यूब सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानातील सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचले. त्यांच्याशी संपर्क साधला आणि गरजूंना वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून मदत केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian Man Installs Hand Pumps In Poor Pak District