भारतीय खगोलशास्त्रज्ञ डॉ. कुलकर्णी यांना प्रतिष्ठेचा डॅन डेव्हिड पुरस्कार

स्वप्नील जोगी
गुरुवार, 18 मे 2017

खगोलशास्त्रातील योगदानाबद्दल भारतीय शास्त्रज्ञ डॉ. श्रीनिवास कुलकर्णी यांना प्रतिष्ठेचा डॅन डेव्हिड पुरस्कार जाहीर झाला आहे.

पुणे : खगोलशास्त्रातील योगदानाबद्दल भारतीय शास्त्रज्ञ डॉ. श्रीनिवास कुलकर्णी यांना प्रतिष्ठेचा डॅन डेव्हिड पुरस्कार जाहीर झाला आहे.

डॉ. कुलकर्णी हे कॅलिफोर्नियातील पसादेना येथील कॅलिफोर्निया इन्स्टिट्युट ऑफ टेक्‍नॉलॉजीमध्ये खगोलशास्त्र आणि ग्रहशास्त्र विषयाचे प्राध्यापक आहेत. त्यांच्या खगोलशास्त्रातील योगदानाबद्दल तेल अविव विद्यापीठातील डॅन डेव्हिड फाऊंडेशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर हा पुरस्कार देण्यात येतो. दहा लाख अमेरिकन डॉलर असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

कुलकर्णी यांना मिळालेल्या पुरस्कारासंदर्भात त्यांच्याशी अनेक वर्षांपासून घनिष्ठ संबंध असलेले आयुकातील प्रा अजित केंभावी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. जागतिक पातळीवरील महत्वाच्या खगोल शास्त्रज्ञांपैकी डॉ. कुलकर्णी यांचा समावेश होत असल्याचे सांगत त्यांचे या क्षेत्रातील योगदान अनन्यसाधारण आहे, असे केंभावी यांनी सांगितले. "डॉ. कुलकर्णी यांचे अनेक शोध महत्वाचे आहेत. मात्र, "रेडिओ पल्सर' या ताऱ्यासंदर्भात (खगोल प्रकाशस्त्रोत) त्यांनी केलेले काम अतिशय मोलाचे आहे. याशिवाय अवकाशातील ट्रान्झियंट सोर्सेसवरही त्यांनी अनेक वर्षे भरीव संशोधन केलेले असून त्यांनी केलेले काम यापूर्वी कोणीही केलेले नाही', अशी माहिती केंभावी यांनी दिली.

कुलकर्णी यांच्या कौटुंबिक पार्श्‍वभूमीबाबत बोलताना केंभावी म्हणाले, "फार पूर्वी कुलकर्णी यांचे कुटुंब सांगलीत राहत असे. मात्र, त्यांचे बालपण हुबळीत गेले. त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण हुबळी येथेच झाले. पुढे त्यांनी आयआयटी दिल्ली येथे उच्च शिक्षण घेतले. त्यानंतर कॅलिफोर्निया विद्यापीठात पीएचडी मिळवून ते कॅलिफोर्निया टेक्‍नॉलॉजी विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रूजू झाले.

Web Title: Indian Scientist Shrinivas Kulkarni Wins Dan David Prize For His Contribution In The Field Of Astronomy