नवाल्नींबाबत जर्मनीचा दुटप्पीपणा; रशियाचा उलटवार

वृत्तसंस्था
Monday, 7 September 2020

नवाल्नी आजारी पडण्याबाबत नेमके काय घडले याचे स्पप्टीकरण जर्मनीने मागितले असताना, रशियाने विषबाधेच्या दाव्याबाबत खुलाशाची मागणी करीत उलटवार केला.

मॉस्को - राजकीय विरोधक अॅलेक्सी नवाल्नी यांच्या कथित विषबाधेप्रकरणी चौकशी करतानाच जर्मनीकडून दुहेरी चाल खेळली जात आहे का, असे प्रश्नचिन्ह रशियाकडून उपस्थित करण्यात आले. नवाल्नी आजारी पडण्याबाबत नेमके काय घडले याचे स्पप्टीकरण जर्मनीने मागितले असताना, रशियाने विषबाधेच्या दाव्याबाबत खुलाशाची मागणी करीत उलटवार केला.

उपचारांबाबत माहिती देण्यात पारदर्शकता दाखवावी असे दोनच दिवसांपूर्वी रशियाने म्हटले होते. रासायनिक अस्त्रासाठी वापरले जाणारे नोव्हीचोक हे द्रव्य देऊन नवाल्नी यांच्यावर विषप्रयोग झाल्याचा नि-संदिग्ध पुरावा असल्याचा दावा जर्मनीने केला आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अडथळ्यांचा आरोप
रविवारी रशियाच्या परराष्ट्र प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांनी जर्मनीवर गंभीर आरोप केला. त्या म्हणाल्या की, स्पष्टीकरण द्यावे अन्यथा निर्बंधांना सामोरे जावे असे जर्मनीतर्फे सांगण्यात आले होते. त्यानंतर जर्मनीच चौकशीच्या प्रयत्नांमध्ये अडथळे आणत आहे.
जर्मनीचे परराष्ट्र मंत्री हैको मास यांनी निर्बंधांबाबतचे वक्तव्य केले होते. त्यानंतर जाखारोवा म्हणाल्या की, यासंदर्भात त्वरेने कार्यवाही व्हावी असा जर्मनीचा आग्रह आहे, पण त्यांच्या पातळीवर तरी तसे दिसत नाही. हा दुटप्पीपणाच नाही का? जर्मनी तसे मुद्दाम करीत आहे का?

रशियाने स्पष्टीकरण दिले नाही तर जर्मनी निर्बंधांबाबत चर्चा करेल. युरोपीय महासंघाचे नेतृत्व सध्या जर्मनीकडे आहे. येत्या काही दिवसांत रशियाने स्पष्टीकरण दिले नाही तर मित्र राष्ट्रांच्या साथीत प्रत्युत्तर देणे भाग पडेल. कोणतेही निर्बंध ठरले तर त्यामागे विशिष्ट उद्देश राहील, असेही मास यांनी स्पष्ट केले आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रथमच वापर
रशियन भूमीत उच्चपातळीवरील राजकीय विरोधकाविरुद्ध रासायनिक अस्त्रातील द्रव्याचा वापर झाल्याची ही पहिली ज्ञात घटना मानली जात आहे. नवाल्नी यांच्या सहकाऱ्यांचा तसा दावा आहे. हे धक्कादायक असल्याची भावना पाश्चिमात्य नेते आणि अनेक रशियन नागरिकांनी व्यक्त केली आहे. विषप्रयोगाचा कोणताही पुरावा आढळला नसल्याचे रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जी लॅव्रोव यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रशियाच्या सरकारी वकिलांच्या कार्यालयातर्फे  जर्मनीला विनंती करण्यात आली होती. पण, त्यावर अद्याप प्रतिसाद मिळू शकलेला नाही. जर्मनीचे सरकार गांभीर्याने विधाने करीत असेल, तर आमच्या विनंतीवर शक्य तितक्या लवकर प्रतिसाद सादर करण्यात त्यांना रस असला पाहिजे.
- मारिया झाखारोवा, रशियाच्या परराष्ट्र प्रवक्त्या

ब्रिटनकडूनही दबाव
नवाल्नी यांच्यासंदर्भात ब्रिटननेही दबाव आणला. परराष्ट्रमंत्री डॉमिनिक राब म्हणाले की, नोव्हीचोक या घातक रसायनाचा जर्मनीने उल्लेख केला आहे. त्यावरून रशियासमोर उत्तर देण्यासाठी अत्यंत गंभीर प्रश्न आहेत. सरकारच्या एखाद्या व्यक्तीचा हात आहे की नाही, यापेक्षा आपल्या भूमीवर रासायनिक अस्त्रांचा वापर होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे बंधन रशियावर आहे.

बाल्टिक सागराच्या खालून टाकण्यात येत असलेल्या गॅसवाहिनीच्या प्रकल्पाचा फेरविचार करण्यास रशिया आम्हाला भाग पाडणार नाही, अशी मला आशा आहे. येत्या काही दिवसांत रशियाने चौकशीसंदर्भात काही योगदान दिले नाही, तर आम्हाला सहकारी देशांशी चर्चा करावी लागेल.
- हैको मास, जर्मनीचे परराष्ट्रमंत्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inquiry into alleged poisoning of Alexei Navalny Germany is playing a double trick