Insurance policy : २३ कोटींच्या विम्यासाठी त्यांनी गमावले दोन्ही पाय, मात्र... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

train accident

२३ कोटींच्या विम्यासाठी त्यांनी गमावले दोन्ही पाय, मात्र...

हंगेरी : जग जसे वेगाने बदलत आहे तसे वाहतूकही वाढत चालली आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर आपण सुखरूप घरी परतूच याची कोणीही शाश्वती देऊ शकत नाही. तसेच आजच्या जीवनशैलीमुळे कोणाला कधी काय होईल हे कोणीही सांगू शकत नाही. यामुळेच आपले तसेच कुटुंबाचे जीवन सुरक्षित करण्यासाठी प्रत्येकजण पॉलिसी काढून ठेवत आहे. मात्र, याचाच गैरफायदा घेत असल्याचे दिसून येत आहे. अशीच एक घटना उघडकीस आली आहे.

‘डेली स्टार’ने दिलेल्या बातमीनुसार, हंगेरीतील न्यरक्साझारी येथील सॅन्डर सीएस (वय ५४) यांनी तब्बल १४ विमा पॉलिसी काढल्या होत्या. या पॉलिसीचा विमा २३ कोटींचा होता. काढलेल्या विम्याचे पैसे मिळावे म्हणून त्यांनी ट्रेनखाली येऊन दोन्ही पाय गमावले. असे केल्याने आपल्याला नुकसानभरपाई मिळेल, अशी त्यांना आशा होती. मात्र, अनेक वर्षे उलटूनही त्यांना २३ कोटी ९७ लाखांचा विमा मिळू शकला नाही.

हेही वाचा: एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याचा खून

२०१४ मध्ये झालेल्या या धक्कादायक घटनेत त्यांनी दोन्ही पाय गमावले. तेव्हापासून ते कृत्रिम पाय लावून जीवन जगत आहे. तसेच व्हीलचेअरवर आहे. अपघातात पाय गमावल्यानंतर सॅन्डर यांनी विमा कंपन्यांकडे सुमारे २३ कोटी ९७ लाख रुपयांच्या भरपाईसाठी संपर्क साधला. सॅन्डरने पाय गमावल्याच्या काही दिवसांआधीच १४ उच्च जोखीम जीवन विमा पॉलिसी घेतल्या होत्या. याबाबत विमा कंपन्यांना समजल्यावर त्यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी नुकसान भरपाई देण्यास उशीर केला.

नुकसान भरपाई मिळण्यास उशीर होत असल्याचे पाहून सॅन्डर संतापले आणि कोर्टात धाव घेतली. कोर्टात झालेल्या सुनावणीत विमा कंपन्या आणि सॅन्डर यांनी आपापली बाजू मांडली. बचत खात्यांपेक्षा विमा पॉलिसींवर परतावा चांगला मिळतो. त्यामुळेच पॉलिसी काढल्याचे सॅन्डर यांनी सांगितले. काचेच्या तुकड्यावरून घसरल्याने अपघात झाल्याचे त्यांनी सांगितले. सात वर्षे चाललेल्या सुनावतीनत मुद्दाम अपघात घडवल्याचा निर्णय कोर्टाने दिला. त्यामुळे विमा कंपन्यांना त्यांना नुकसानभरपाई देण्याची गरज नाही, असेही कोर्टाने सांगितले.

loading image
go to top