Mother Language | मुलांना बनवायचे असेल खूप हुशार तर, मातृभाषेतील शिक्षणाचा घ्या आधार International Mother Language Day benefits of learning in mother tongue | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

International Mother Language Day

Mother Language : मुलांना बनवायचे असेल खूप हुशार तर, मातृभाषेतील शिक्षणाचा घ्या आधार

मुंबई : आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस आहे. युनेस्को या आंतरराष्ट्रीय संघटनेने मातृभाषेचा पुरस्कार केलेला आहे. एका बाजूला आपल्याकडचा पालकवर्ग अधिकाधिक आंतरराष्ट्रीय होण्यासाठी आग्रही आहे तर दुसऱ्या बाजूला हाच पालकवर्ग युनेस्कोचे संकेत धुडकावत आहे.

लहान मुलांमध्ये कमी वयात जास्तीत जास्त भाषा शिकण्याची क्षमता असते हे मान्य केले तरी भाषा शिक्षण आणि भाषेतून शिक्षण यांमधील फरक जाणून घेण्याची गरज निर्माण झाली आहे. (International Mother Language Day)

युनेस्कोने मातृभाषेतून शिक्षणाचा पुरस्कार केलेला असताना भारतीय आणि विशेषकरून महाराष्ट्रीय पालकांचा कल मात्र इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे अधिक दिसतो आहे. यामुळे भाषिक नुकसान तर होतेच आहे; पण मुलांचे शैक्षणिक नुकसानही तितकेच होत आहे. हेही वाचा - ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ !

आपल्याकडच्या स्थानिक कुटुंबांमध्ये मराठी किंवा महाराष्ट्रातील बोलीभाषा बोलल्या जातात. इंग्रजी माध्यमात शिकण्याचं खूळ हे शहराकडून गावाकडे गेलेलं आहे. त्यामुळे आता आपण शहरी पालकांबद्दल बोलू.

मूल जन्माला येतं तेव्हा त्याच्या कानांवर पडणारा पहिला शब्द त्याच्या मातृभाषेतील म्हणजेच मराठीतील असतो. त्याच भाषेतून त्याचा आधी कुटुंबाशी आणि नंतर समाजाशी संवाद होत राहातो आणि त्यातूनच त्याचं आकलन, शिक्षण सुरू होतं.

जेव्हा मूल शाळेत जातं तेव्हा नैसर्गिकरित्या त्याच भाषेतून त्याचा शाळेशी संवाद होणं अपेक्षित असतं जी भाषा त्याच्या घरात बोलली जाते म्हणजेच मराठी. आजकाल मुलांना इंग्रजी माध्यमात शिकवण्याच्या अट्टहासापायी पालक हा नैसर्गिक संवाद तोडत आहेत.

घरात, शेजारी-पाजारी मराठी बोलली जात असताना शाळेत गेल्यावर अचानक इंग्रजी सुरू होतं तेव्हा संवादाची पर्यायाने शिक्षणाची नैसर्गिक प्रक्रियाच थांबते आणि मुलांच्या मेंदूला शून्यापासून सुरुवात करावी लागते.

मुळात वय लहान आणि त्यात भाषेची अडचण यामुळे मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढतो. मुलांचे आकलन कमी होते. त्यामुळे औपचारिक शिक्षणाच्या उंबरठ्यावरच त्यांच्यात शिक्षणाविषयी अनास्था निर्माण होते.

हळूहळू ही मुलं कशीबशी इंग्रजी माध्यमात तरून जातात. इंग्रजी भाषा बोलू लागतात. आपलं मूल जगाशी स्पर्धा करायला तयार झालं म्हणून पालकही खूष होतात.

याचा उलट परिणाम असा होतो की, मुलांचा जवळच्या लोकांशी संवाद तुटतो. आजी-आजोबांना इंग्रजी येत नसतं. त्यामुळे ते अभ्यास घेऊ शकत नाहीत किंवा मुलांच्या साध्या-साध्या गोष्टीही त्यांना समजत नाहीत.

इंग्रजीचं जेमतेम ज्ञान आणि आपल्या भाषेचे अर्धवट संस्कार यामुळे मुलांना व्यक्त होण्यात अडचणी येतात. अगदी शाळेच्या अभ्यासातला निबंध किंवा वक्तृत्त्व स्पर्धेचं भाषणही मुलं स्वत: लिहू शकत नाहीत. ते इंटरनेटवरून कॉपी केलं जातं.

घरात बोलण्यापुरतं मराठी येत असलं तरी वाचन आणि लेखनाच्या नावाने बोंब असते. हेच इंग्रजीच्याही बाबतीत होतं. त्यामुळे कोणत्याच भाषेवर मुलांची पकड राहात नाही.

पालकांना इंग्रजी समजत असलं तरी इंग्रजी माध्यमाचा अभ्यास घेणं त्यांना झेपेलच असं नाही. त्यामुळे मग कमी वयात ट्यूशनला जाणं ओघाने आलंच. जो विषय आपण शाळेत शिकतो तोच विषय पुन्हा जाऊन ट्यूशनमध्ये शिकायचा.... यात मुलांचा वेळ तर वाया जातोच पण त्या विषयाची ओढही राहात नाही.

डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल काकोडकर यांच्यासारखे शास्त्रज्ञही मातृभाषेतूनच शिकले. त्यांना त्यांचं ध्येय गाठण्यात कोणतीच अडचण आली नाही; कारण जेव्हा तुम्ही मातृभाषेतून शिकता तेव्हा भाषा आधीपासून येत असते फक्त संकल्पना नव्याने शिकून घ्यावी लागते.

याउलट, इंग्रजी माध्यमात शिकत असताना भाषा आणि संकल्पना दोन्ही एकाच वेळी नव्याने शिकून घ्याव्या लागतात. याचा मुलांच्या बौद्धिक विकासावर परिणाम होतो.

मग इंग्रजीच्या जगाशी कसं जुळवून घ्यायचं ?

मातृभाषेतून शिकत असताना संकल्पना स्पष्ट असल्या की पुढे जाऊन आकलनात अडचण येत नाही. राहिला प्रश्न भाषेचा तर... इंग्रजी भाषेचा समांतर अभ्यास मुलं सुरू ठेवू शकतात.

इंग्रजी गाणी ऐकणे, इंग्रजी पुस्तकं वाचणे, इत्यादी मार्गांनी भाषेची ओळख होत राहाते. सोसायटीत किंवा कला आणि खेळांच्या प्रशिक्षणांना मुलं जेव्हा बाहेर जातात तेव्हा अनेक अमराठी, इंग्रजी बोलणाऱ्या मुलांशी त्यांचा संपर्क येत असतो. तिथे इंग्रजी बोलण्याची संधी मिळू शकते.

मराठी माध्यमात शिकलेली मुलं इंग्रजीचं वर्चस्व असलेल्या क्षेत्रात काम करतात तेव्हा त्या क्षेत्राचं ज्ञान आपल्या भाषेत उपलब्ध करण्यासाठी ही मुलं योगदान देऊ शकतात.

इंग्रजी बोलण्यासाठी आवश्यक आहे फक्त आत्मविश्वास. याच आत्मविश्वासाच्या बळावर तुम्ही जगातल्या कोणत्याही भाषा कोणत्याही वयात शिकून घेऊ शकता.

मातृभाषेतून शिक्षणाचे हे फायदे जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहोचावेत यासाठी हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन महत्त्वाचा ठरतो.