अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना अटक करा; इराणच्या मागणीमुळे ट्रम्प अडचणीत

टीम ई सकाळ
Wednesday, 6 January 2021

अमेरिकेनं सुलेमानीला बगदाद दौऱ्यावेळी 3 जानेवारी 2020 ला ड्रोन हल्ला करून ठार केलं होतं. संयुक्त राष्ट्रांच्या धिकाऱ्यांनी अमेरिकेचा हल्ला बेकायदेशीर होता असं म्हटलं होतं. 

तेहरान - इराणने आंतरराष्ट्रीय संस्था इंटरपोलकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इतर 47 अधिकाऱ्यांविरोधात रेड कॉर्नर नोटिस जारी करण्याची मागणी केली आहे. इराणचे म्हणणे आहे की, गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात जनरल कासिम सुलेमानी यांच्या हत्येचा कट रचण्यामध्ये सहभागी असलेल्या ट्रम्प यांना पकडण्यासाठी इंटरपोलने मदत करावी. 

इराणचे प्रवक्ते गुलाम हुसैन इस्माइली यांनी सांगितलं की, रिव्होल्युशनरी गार्डसचे कमांडर शहीद सुलेमानी यांच्या हत्ये प्रकरणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि संरक्षण मंत्रालयाच्या कमांडरसह अधिकाऱ्यांविरोधात रेड कॉर्नर नोटिस जारी करण्यात यावी. यासाठी इंटरपोलला पत्र पाठवण्यात आलं आहे. इराणने सुलेमानी यांच्या हत्या प्रकरणात सहभागी असलेल्यांना शिक्षा देण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

इंटरपोलच्या मते त्यांची रेड कॉर्नर नोटिस ही जगभरातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणाऱ्या संस्थाकडे आरोपींचे प्रत्यार्पण, शरणागती आणि कायदेशीर कारवाईची मागणी म्हणून ओळखली जाते. त्यांची नोटीस ही अॅरेस्ट वॉरंटसारखी नाही.

जनरल कासिम सुलेमानी इराणच्या लष्करातील स्पेशल फोर्सेसच्या रिव्होल्युशन गार्डसच्या कुदस फोर्सचा कमांडर होता. अमेरिकेनं सुलेमानीला बगदाद दौऱ्यावेळी 3 जानेवारी 2020 ला ड्रोन हल्ला करून ठार केलं होतं. संयुक्त राष्ट्रांच्या धिकाऱ्यांनी अमेरिकेचा हल्ला बेकायदेशीर होता असं म्हटलं होतं. इराणने गेल्या वर्षी जून महिन्यात इंटरपोलकडे डोनाल्ड ट्रम्प आणि इतर अमेरिकन अधिकाऱ्यांना अटक करण्यासाठी मदतीची मागणी केली होती. इराण सातत्याने अमेरिकेवर हत्या आणि दहशतवाद पसरवण्याचा आरोप करत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: iran ask help to interpole for red corner notice against trump and us officers