'जैश-ए-मोहम्मद'चा तळ खरंच नष्ट झाला?

mirage-2000.
mirage-2000.

लंडन - 26 फेब्रुवारीला पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा भागातील बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या प्रशिक्षण तळाला लक्ष्य केल्याचे भारताने म्हटेल आहे. या कारवाईत तिथे असलेल्या अनेक अतिरेक्यांना ठार केल्याचेही भारताने म्हटले. मात्र नेमके किती दहशतवादी गेले याचा कोणताही अधिकृत आकडा समोर आलेला नाही. पाकिस्तानने मात्र भारताने एका निर्मनुष्य ठिकाणी हल्ला केल्याचे म्हटले आहे. तसेच यामध्ये कोणाचाही जीव गेला नसल्याचेही पाकिस्तानचे म्हणणे आहे. 

या सगळ्या कारवाईबाबत दोन्ही देशांच्या भूमिकांमध्ये विरोधाभास आहे. मात्र दोन्ही देशांच्या दाव्यांची सत्यता नेमकी काय आहे, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. यासाठी पाकिस्तानने आपले दावे सत्य आहेत हे दाखविण्यासाठी आंतराष्ट्रीय मिडियाला बालाकोटमध्ये दौरा घडविण्याचे निमंत्रण दिले होते. मात्र हा दौरा देखील रद्द करण्यात आला. 

असे असताना काही आंतरराष्ट्रीय मिडियाच्या प्रतिनिधिंनी घटनास्थळाचा आढावा घेतला असल्याचे म्हटले आहे. बालाकोटमधल्या जाबा टॉप या ठिकाणी भारतीय हवाई दलाने हल्ला केला होता. तिथल्या परिस्थितीविषयी आंतताष्ट्रीय मिडियाने केलेले रिपोर्टींग..

बीबीसीने दिलेला ग्राउंड रिपोर्ट
भारतीय कारवाईनंतर बीबीसीच्या सहर बलोच या बालाकोटमध्ये गेल्या होत्या. त्यांनी स्थानिकांशी संवाद साधल्याचे बीबीसीने म्हटले आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या नूरान शाह या स्थानिकाशी त्यांनी संवाद साधला.

शाह यांचे घर घटनास्थळाजवळ आहे. त्यांनी सांगितले, "काल रात्री मी झोपलो होतो. तेव्हा कानठाळ्या बसवणाऱ्या आवाजाने जाग आली. उठलो तेव्हा खूप मोठा स्फोट झाला. स्फोट झाल्यावर मी बाहेर पडायचा प्रयत्न केला. मला वाटलं, हे काहीतरी भयंकर आहे. मी दाराजवळ आलो तेव्हा तिसरा स्फोट झाला. ते ठिकाण 15 मीटर किंवा त्यापेक्षा जवळ असेल."

"दुसरा स्फोट झाला तेव्हा दरवाजे तुटले. तेव्हा मी, माझी मुलगी आणि माझी बायको आम्ही तिघं तिथंच बसलो. मला वाटले, आता आम्ही तिघे मरणार. त्यानंतर खाली थोड्या अंतरावर चौथा स्फोट झाला. आम्ही तिथेच बसून राहिलो.

"थोड्या वेळाने आम्ही उठलो. बाहेर पडलो तर घराच्या भिंती, छप्पर यांना तडे गेले होते. अल्लाहने आम्हाला वाचवले. माझ्या डोक्यावर थोडी दुखापत झाली आहे. पाय आणि कमरेवर थोड्या जखमा आहेत," असे त्यांनी सांगितलं.

पाकिस्तानी सैन्याच्या येण्याने त्या भागातील रहदारीवर काय परिणाम झाला, याविषयी तिथल्या एका विद्यार्थ्याने "सकाळपासून लोकांना इथे यायला बंदी घातली असल्याचे सांगितले.

अल-जझिराने लिहिले...
कतारचे अल-जझिराने लिहिले आहे की, "बुधवारी हल्ल्याच्या ठिकाणी गेल्यावर अल-जझिराला दिसले की, उत्तर पाकिस्तानच्या जाबा टॉपबाहेर जंगल आणि दुर्गम भागात चार बॉम्ब पडले होते. बॉम्बस्फोटामुळे झालेल्या खड्ड्यांमध्ये झाडे आणि दगड पडली होती. मात्र तिथे कुठल्याही प्रकारचा ढिगारा किंवा जीवितहानी झाल्याचे पुरावे नाही."

भारतीय हवाई हल्ल्यानंतर तिथे मृतदेह किंवा कुणी जखमी झाल्याचे दिसले नाही, असे स्थानिक हॉस्पिटलचे अधिकारी आणि तिथे पोहोचलेल्या रहिवाशांनी सांगितले आहे.

मात्र, त्या भागात जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण शिबिराविषयी स्पष्ट माहिती मिळाली नाही. जिथे बॉम्ब हल्ले झाले, तिथून एक किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या एका डोंगरमाथ्यावर एक मदरसा आहे. हा मदरसा जैश-ए-मोहम्मद चालवत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली असल्याचेही अल- जझिराने म्हटले आहे.

काही अंतरावर एक साईनबोर्ड होता, त्यावरून स्पष्ट झाले की तिथे शाळा आहे, जी एक सशस्त्र गट चालवत होता.
या बोर्डावर तलीम-उल-कुरान मदरशाचा प्रमुख मसूद अझहर असल्याचे आणि मोहम्मद युसूफ अझहर प्रशिक्षक असल्याचे स्पष्ट होत होत. असेही अल जझिराने म्हटेले आहे. 

अल जझिराने दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने ओळख उघड न करता सांगितले, "डोंगरावर उभारलेला मदरसा अतिरेक्यांचे प्रशिक्षण शिबीर होते."

31 वर्षांच्या दुसऱ्या एका व्यक्तीने सांगितले, "तिथे जैशचे शिबीर असल्याचे प्रत्येकालाच माहिती होते. तिथे लोकांना युद्धाचे प्रशिक्षण दिले जायचे."

31 जानेवारी 2004 मध्ये विकिलीक्सने अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचा एक मेमो लीक केला होता. त्यात जाबाजवळ जैश-ए-मोहम्मदचे प्रशिक्षण शिबीर असल्याचे म्हटले आहे. तसेच शस्त्रास्त्र आणि स्फोटकांचे बेसिक आणि अॅडव्हान्स्ड प्रशिक्षण दिले जाते असेही त्यात म्हटले आहे.

रॉयटर्सने दिलेली माहिती...
झालेल्या हल्यात एक जण जखमी झ्याचे रॉयटर्सने म्हटले आहे. जाबामध्ये डोंगरांकडे बोट दाखवत गावकऱ्यांनी सांगितले की इथे चार बॉम्ब पडल्याच्या खुणा आहेत, आणि झाडे पडली आहेत.

त्या भागात वॅन चालवणाऱ्या अब्दुल रशीद यांनी सांगितले, "या स्फोटांनी सगळंच हादरले. कुणी मेलेले नाही, काही झाडे पडली आणि एका कावळा मेला."

'रॉयटर्स'ने साधारण 15 लोकांशी संवाद साधला. मात्र नूरान शाहशिवाय कुणीही जखमी नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मात्र तिथे जैश-ए-मोहम्मद असल्याचे स्थानिकांनी सांगितले. जैश-ए-मोहम्मदचे इथे प्रशिक्षण शिबीर तर नाही, मात्र एक मदरसा असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

या मदरशाचे 'जैश-ए-मोहम्मद'शी कनेक्शन आहे, असे सांगणारा तो साईनबोर्ड गुरुवारी काढण्यात आला आणि मीडियाला तिथे जाण्यापासून रोखण्यात आले. मात्र मागून ती मदरशाची इमारत दिसत होती आणि तिचे काहीही नुकसान झालेले नसल्याचे 'रॉयटर्स'ने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com