जेरेमी हंट ब्रिटनचे नवे परराष्ट्रमंत्री

पीटीआय
बुधवार, 11 जुलै 2018

ब्रिटनचे मावळते परराष्ट्रमंत्री बोरिस जॉन्सन यांनी सोमवारी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. ब्रिटनचे ब्रेक्‍झिट विभागाचे मंत्री डेव्हिड डेव्हिस यांनी पद सोडल्यानंतर जॉन्सन यांनीही राजीनामा सादर करत खळबळ उडवून दिली होती.

लंडन : दोन मंत्र्यांनी तडकाफडकी राजीनामा सादर केल्यामुळे अडचणीत आलेल्या ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी आज परराष्ट्रमंत्र्यांची नियुक्ती करून आपल्या नेतृत्वाभोवती निर्माण झालेल्या शंका कमी करण्याचा प्रयत्न केला. मे यांनी विद्यमान आरोग्यमंत्री जेरेमी हंट यांची नवे परराष्ट्रमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. 

ब्रिटनचे मावळते परराष्ट्रमंत्री बोरिस जॉन्सन यांनी सोमवारी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. ब्रिटनचे ब्रेक्‍झिट विभागाचे मंत्री डेव्हिड डेव्हिस यांनी पद सोडल्यानंतर जॉन्सन यांनीही राजीनामा सादर करत खळबळ उडवून दिली होती. दोन मंत्र्यांनी अचानक राजीनामा दिल्यामुळे मे यांच्या नेतृत्वावार प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे मानले जात आहे. 

नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना हंट म्हणाले, की युरोपियन युनियनमधून (ईयू) बाहेर पडल्यानंतर ब्रिटन नेमके कसे असेल याची सध्या संपूर्ण जगाला उत्सुकता आहे. ब्रेक्‍झिटच्या मुद्‌द्‌यावर पंतप्रधान मे यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. 
दरम्यान, नवे परराष्ट्रमंत्री म्हणून जेरेमी हंट यांच्या नियुक्तीची घोषणा केल्यानंतर पंतप्रधान मे यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. मे यांच्या विरोधात विश्वासदर्शक ठराव आणण्याच्या हालचाली सुरू असल्याचीही चर्चा आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jeremy Hunt Britains new Foreign Minister