उपाध्यक्षपदासाठी हॅरिस यांना संधी; ज्यो बिडेन यांच्याकडून नाव जाहीर

पीटीआय
Thursday, 13 August 2020

अमेरिकेत सध्या वांशिक संघर्षाचे वातावरण असताना हॅरिस यांना ही संधी मिळाली आहे. देशाला पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठी हॅरिस याच सर्वोत्तम सहकारी आहेत,असे बिडेन यांनी म्हटले आहे. 

वॉशिंग्टन - अमेरिकेतील आगामी अध्यक्षीय निवडणुकीतील डेमोक्रॅटिक पक्षाचे संभाव्य उमेदवार ज्यो बिडेन यांनी उपाध्यक्ष पदासाठी सहकारी (रनिंग मेट) म्हणून भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांची निवड केली आहे. त्यांच्या या ऐतिहासीक निवडीचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. अमेरिकेतील ‘ब्लॅक लाइव्हज मॅटर’ या चळवळीमुळे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात असलेल्या वातावरणाचा फायदा उठविण्यासाठी बिडेन यांनी हॅरिस यांची निवड केल्याचे समजते. 

कमला हॅरिस (वय ५५) या सध्या सिनेटर म्हणून कॅलिफोर्नियाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यांचे वडिल आफ्रिकी वंशाचे, तर आई भारतीय वंशाची आहे. बिडेन यांनी काल हॅरिस यांच्या नावाची घोषणा करत अनेक दिवसांपासूनची उत्सुकता संपवली. पुढील आठवड्यात होणाऱ्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या बैठकीत बिडेन यांची पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून अधिकृत घोषणा होणार आहे. बिडेन यांच्या निर्णयामुळे एका मोठ्या पक्षातर्फे उपाध्यक्ष पदावर निवडून येण्याची संधी मिळालेल्या हॅरिस या पहिल्या कृष्णवर्णीय आणि आशियायी-अमेरिकी महिला ठरल्या आहेत. अमेरिकेत सध्या वांशिक संघर्षाचे वातावरण असताना हॅरिस यांना ही संधी मिळाली आहे. देशाला पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठी हॅरिस याच सर्वोत्तम सहकारी आहेत, असे बिडेन यांनी म्हटले आहे. हॅरिस यांनीही आपल्याला ही संधी मिळाल्याबद्दल आभार मानले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उपाध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी महिलेचीच निवड बिडेन यांनी मार्च महिन्यातच जाहीर केले होते. ‘ब्लॅक लाइव्हज्‌ मॅटर’ या आंदोलनानंतर उमेदवार म्हणून कृष्णवर्णीय महिलेचीच निवड करण्यासाठी बिडेन यांच्यावरील दबाव वाढला होता. त्यांनी आफ्रिकी आणि आशियायी वंशाच्या हॅरिस यांची निवड करून मोठ्या संख्येने असलेल्या दोन्ही समुदायांना खूश केल्याचे तज्ज्ञांनी विश्‍लेषकांनी सांगितले. 

भारतीयांकडून स्वागत
हॅरिस यांच्या निवडीचे भारतीय नागरिकांनी आणि इतर प्रतिष्ठीत व्यक्तींनी स्वागत केले आहे. ही योग्य निवड असून आम्हाला अभिमान वाटतो आहे, अशी प्रतिक्रिया ‘पेप्सिको’ कंपनीच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रा नूयी यांनी दिली आहे. काही जणांनी मात्र भारत-अमेरिका संबंध वाढविण्यात हॅरिस यांचा फारसा सहभाग नसल्याचे म्हटले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हे आश्‍चर्यच : ट्रम्प
ज्यो बिडेन यांनी कमला हॅरिस यांची निवड केल्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे. बिडेन यांच्याबरोबरील हॅरिस यांची वर्तणूक फारशी चांगली नसतानाही ही निवड झाल्याचे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. ‘हॅरिस यांनी प्राथमिक निवडणुकांमध्ये फारशी चमक दाखविलेली नाही. त्यांना लोकांचा पाठिंबाही मिळालेला नाही. बिडेन यांच्याबद्दल त्यांनी अनेकदा अनादर दाखवला आहे,’ असे ट्रम्प यांनी ट्वीटरवर म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Joe Biden has named Kamala Harris upcoming US presidential election