अमेरिकेच्या पहिल्या हुतात्मा जवानाच्या वडीलांची संतप्त भावना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mike Spann

अमेरिकेच्या पहिल्या हुतात्मा जवानाच्या वडीलांची संतप्त भावना

माँटगोमेरी, अलाबामा - न्यूयॉर्कवरील (Newyork) दहशतवादी हल्ल्यानंतर (Terror Attack) पेटून उठलेल्या, क्रूरकर्मा ओसामा बीन लादेन (Osama Bin Laden) याला शोधून काढण्याचा विडा उचललेल्या, त्यासाठी लष्करात (Army) भरती होत बालपणीचे स्वप्न साकारलेल्या अन् अखेरीस अफगाणिस्तानमध्ये धारातीर्थी पडलेल्या अमेरिकेच्या पहिल्या जवानाचे शोकमग्न वडील तेथील ताज्या घडामोडींमुळे संतप्त झाले आहेत. अमेरिकेचे सैन्य माघारी परतत असताना अफगाणिस्तानमध्ये झालेला शेवट लाजीरवाणा आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया जॉनी स्पॅन (Johnny Span) यांनी व्यक्त केली.

जॉनी यांचा मुलगा माईक ११ सप्टेंबर २००१ रोजी न्यूयॉर्कवरील हल्ल्यानंतर लष्करात भरती झाला. काही दिवसांत त्याला अफगाणिस्तानच्या मोहिमेवर पाठविण्यात आले. त्याचवर्षी २५ नोव्हेंबर रोजी उत्तर अफगाणिस्तानमधील मजार-ए-शरीफ येथील काला-ए-जांगी या किल्ल्यातील तुरुंगात तालिबानी कैद्यांच्या उद्रेकात तो मारला गेला. माईक ३२ वर्षांचा होता. अफगाणिस्तानमध्ये आतापर्यंत मारल्या गेलेल्या अमेरिकेच्या २४४८ पहिला हुतात्मा म्हणून त्याची नोंद झाली आहे.

हेही वाचा: 102 व्या स्वातंत्र्य दिनाच्या रॅलीत तालिबानींचा गोळीबार; अनेकांचा मृत्यू

जॉनी म्हणाले की, अफगाणिस्तानमधून अमेरिकेने गोंधळात माघार घेतल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीची छायाचित्र बघताना मला खूप यातना होतात. तालिबानपासून बचावण्यास अधीर झालेल्या लोकांचे सैरावैरा धावणे, अमेरिकी लष्कराच्या झेपावणाऱ्या विमानाला लटकण्याचे त्यांचे प्रयत्न क्लेशदायक आहेत. विमानाला लटकलेले काही जण पडले. हे पाहून माझ्या पोटात धस्स झाले. विमाने धडकल्यानंतर आमच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या टॉवरवरून उड्या मारणाऱ्या देशबांधवांची मला आठवण झाली.

सैन्य काढून घेण्यास जॉनी यांचा विरोध नाही, मात्र त्यासाठीची वेळ आणि पद्धतीविषयी त्यांनी प्रतिकूल मत व्यक्त केले. तालिबानने सत्ता काबीज करताच आपला मुलगा आणि इतर अमेरिकी जवानांना मदत केलेल्या अफगाणवासीयांची काळजी त्यांना वाटते. ते (अफगाणवासी) मरणार आहेत. ते (तालिबानी) त्यांना मारून टाकतील. आपण अफगाण जनतेला वचन दिले असताना त्यांची अशी अवस्था होणे कसे सहन होईल...त्यांनी मदत केली नसती तर अमेरिकेत आपण आपले आणखी किती जवान गमावले असते हे सांगता येणार नाही, अशी भावना जॉनी यांनी व्यक्त केली.

जॉनी म्हणाले की, शेवटच्या काही वेळी माईकने मुलांशी संवाद साधण्यासाठी फोन केला. त्यावेळी तो माझ्याशीही बोलला. न्यूयॉर्कवरील हल्ल्याचा सूत्रधार ओसामा याच्या ठावठिकाण्याविषयी माहिती काढण्याबाबत तो आशावादी होता.

हेही वाचा: तालिबानकडून पहिला झटका, भारताबरोबर थांबवला व्यापार

तुला मारण्यासाठी तालिबानी बनलो

माईकने तुरुंगातील कैद्यांची चौकशी सुरु केली. त्यावेळी त्याने एका कैद्याला विचारले की, तू तालिबानमध्ये का गेलास. त्यावर तो कैदी म्हणाला की, तुला मारण्यासाठी. काही मिनिटांत कैदेतील तालिबान्यांचा उद्रेक झाला. आधी एके-४७ आणि नंतर पिस्तूलमधून माईकने प्रतिकार केला, मात्र तालिबान्यांनी घेरल्यानंतर त्याला जीव गमवावा लागला.

जॉनी स्पॅन म्हणतात

अफगाणिस्तानमधून माघार घेतली म्हणजे अमेरिकेला असलेला धोका संपला असे जनतेने मानू नये. युद्ध संपलेले नाही. आपण काबीज केलेल्या भूभागाचा ताबा नुकताच सोडून दिला आहे.

माझा मुलगा ओसामा बीन लादेन याला शोधून काढण्यासाठी अफगाणिस्तानात गेला होता. ओसामा सापडण्यापूर्वी तो मारला गेला, पण कदाचित त्याने केलेल्या काही प्रयत्नांमुळे आपण ओसामापर्यंत पोचू शकलो.

Web Title: Johnny Spann Talking About Afghanisthan End

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Johnny Spann