पत्रकार खाशोगींच्या हत्येला मीच जबाबदार; क्राऊन प्रिन्सची कबुली

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

- जमाल खाशोगींच्या खुनाची
- सौदी युवराजांकडून कबुली
- आपल्या देखरेखीखालीच खून झाल्याचा दावा

रियाध : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पत्रकार जमाल खाशोगी यांचा मागील वर्षी निर्घृण खून झाल्यानंतर एकच खळबळ निर्माण झाली होती, आता सौदीच्या युवराजांनी या खुनाची जबाबदारी स्वत: स्वीकारल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. एका वृत्तवाहिनीच्या डॉक्‍युमेंट्रीमध्ये युवराजांनीच खाशोगी यांचा खून माझ्या देखरेखीखालीच झाल्याची कबुली दिसून पुढील आठवड्यामध्ये तिचे प्रसारण होणार आहे. इस्तंबूलमधील सौदीच्या दूतावासामध्येच खाशोगी यांना ठार मारण्यात आले होते.

सौदीचे युवराज मोहमंद बिन सलमान यांनी आतापर्यंत खाशोगी यांच्या खुनाबाबत कधीच उघड भाष्य केले नव्हते, पण आता मात्र त्यांनीच याची कबुली दिली आहे. दरम्यान, सीआयए आणि काही पाश्‍चात्त्य गुप्तहेर संघटनांनी याआधीच सौदीच्या युवराजांनीच खाशोगींना मारण्याचे आदेश दिल्याचा दावा केला होता, सौदीच्या अधिकाऱ्यांनी मात्र तो फेटाळून लावला होता.

खाशोगी यांच्या खुनाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील तीव्र पडसाद उमटले होते. सौदी युवराजांच्या प्रतिमेलाही यामुळे तडा गेला होता, विविध स्तरांतून होणाऱ्या आरोपांना तोंड देताना त्यांच्या नाकीनऊ आले होते. या घटनेनंतर त्यांनी अमेरिका आणि युरोपला भेट देणेही टाळले होते. "पब्लिक ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस'चे मार्टीन स्मिथ हे डॉक्‍युमेंटरीबाबत म्हणाले, की खाशोगी यांच्या मृत्यूला 1 ऑक्‍टोबर रोजी एक वर्ष पूर्ण होत असल्यामुळे त्याच दिवशी ही डॉक्‍युमेंटरी देखील प्रसिद्ध केली जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Journalist Khashoggis Murder Happened Under My Watch Says Saudi Crown Prince