"कमला हॅरिस अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होणे अपमानाची गोष्ट असेल"

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 9 September 2020

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं आहे

वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं आहे. अमेरिकी नागरिक कमला यांचा द्वेष करतात आणि जर त्या पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्या तर ती अमेरिकेसाठी अपमानाची गोष्ट असेल, असं ते म्हणाले आहेत. एका प्रचार सभेत ते बोलत होते. 

हे खूप सोपं आहे. जर जो बायडेन जिंकले, तर चीन जिंकेल. जगाच्या इतिहासात आपण सर्वश्रेष्ट अर्थव्यवस्था बनवली होती. मात्र, चीनच्या महामारीमुळे आपल्याला अर्थव्यवस्था बंद करावी लागली. पण, आपण ती पुन्हा सुरु करु, असं डोनाल्ड ट्रम्प नॉर्थ कॅरोलिनामधील सभेत म्हणाले.  

लोकांना त्या आवडत नाहीत. त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होऊ  शकत नाहीत. असं झालं तर ते आपल्या देशासाठी अपमानाची गोष्ट असेल, असंही ते म्हणाले. चीन आणि दंगलखोरांना जो बायडेन राष्ट्रपती व्हावे असं वाटत आहे. याचे कारण स्पष्ट आहे, त्यांच्या पॉलिसी अमेरिकेच्या अधोगतीचे कारण ठरतील. त्यामुळे त्यांना तेच राष्ट्रपती म्हणून हवे आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे. 

राहुल गांधींचा मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल; व्हिडिओ मालिकेतील दहा प्रमुख मुद्दे

कमला हॅरिस यांनी राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीतून माघार घेतली होती. तरीही डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडेन यांनी त्यांनाच उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून निवडलं. आपण चीनसोबत आता वेगळ्या पद्धतीची व्यापारी भागीदारी करत आहोत. कोरोनासारखी भयंकर महामारी चीनमुळे आपल्या देशात आली. त्यामुळे आता आपला चीनसोबतचा व्यवहार पूर्णपणे वेगळा असेल, असंही ते म्हणाले. 

दरम्यान, अमेरिकेत ३ नोव्हेंबर रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका पार पडणार आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यावेळी आमनेसामने आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा अध्यक्ष होण्याची इच्छा आहे. मात्र, यावेळी त्यांच्यासमोर अनेक अडचणी आहेत. जो बायडेन यांना लोकांची पसंती मिळताना दिसत आहे. 

कोरोना महामारीपुढे अमेरिका हतबल झाली आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना महामारी हाताळण्यात अपयश आल्याचा आरोप होत आहे. शिवाय वर्णवादावरुन अमेरिकेत आंदोलने उसळली आहेत. आर्थिक आघाडीवरही देशाती पिछाडी होताना दिसत आहे. अशा अभूतपूर्व परिस्थिती राष्ट्रपतीपदावर कोण विराजमान होईल, याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. 

(edited by- kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kamala Harris Becoming First Woman President Will Be Insult To US said donald Trump