युद्धभूमीवर ‘कारगिली खुबानी’चा रंग बहरला

आंतरराष्ट्रीय बाजारात काश्‍मीरच्या जर्दाळंूची विक्रमी निर्यात; स्थानिक अर्थव्यवस्थेला हातभार
Kargil Kashmir international market agriculture product export economy
Kargil Kashmir international market agriculture product export economy

हरदास (कारगिल) : पाकिस्तानशी झालेल्या युद्धाच्या भयंकर झळा सोसणाऱ्या कारगिलची ओळख खुबानीमुळं (जर्दाळू) बदलू लागली आहे. सध्या युद्धभूमीत ‘कारगिली खुबानी’चा लाल रंग अधिक बहरत आहे. हा प्रदेश आता आंतरराष्ट्रीय स्तरावर या ‘खुबानी’ ची गोड चव पोचवू लागला आहे.

कारगिलची पहिली ओळख हा युद्धजन्य प्रदेश. ती पुसण्यासाठी पर्यटनाचा आधार तिथे घेतला गेला. सुर, व्हॅली, झंस्कार, आर्यन व्हॅली, द्रास या भागांनी पर्यटकांना आकर्षित केले. आर्थिक प्रगतीला त्याचा हातभार लागला. मात्र आर्थिक सुबत्ता येण्यासाठी आणखी प्रयत्न त्यांना करावे लागत होते. त्यासाठी कारगिलची माती कामी आली आणि गावाचं अर्थकारण कोटींमध्ये खेळू लागलं. ड्रायफ्रूट म्हणून ओळखलं जाणारं जर्दाळू (अॅप्रिकॉट) हे कारगिलचं एक पीक. इथं त्याला ‘खुबानी’ म्हणतात. मातीचा पोत, वातावरण याचा अभ्यास करून चांगल्या दर्जाचं जर्दाळू पीक घेण्यावर भर देण्यात आला. गेल्या दोन वर्षांपासून त्याचे दृश्य परिणाम दिसू लागले आहेत. गतवर्षी २५ टन आणि या वर्षी ३५ टन जर्दाळू आंतरराष्ट्रीय बाजारासाठी निर्यात करण्यात आली. यामुळे कारगिल सेक्टरमधील अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागला. केवळ जर्दाळूच्या पिकामुळे या जिल्ह्याची वार्षिक उलाढाल १५ कोटी रुपयांपर्यंत गेली आहे.

जर्दाळूसाठी मॉडेल हरदास

कारगिलपासून सात किलोमीटरवर असलेलं हरदास गाव हे तर ‘मॉडेल अॅप्रिकॉट व्हिलेज’ म्हणून राज्य सरकारनं विकसित केलंय. या गावातील मोहम्मद मेहबूब सांगतात, की हरदास गावातील सर्वच कुटुंबे जर्दाळूची शेती करतात. येथील जर्दाळू उच्च प्रतीचा मानला जातो. या ‘हलमन’ला बाजारपेठेत चांगला भावही मिळतो आहे. त्यामुळे गावाला या पिकामधून मिळणारं उत्पन्न दोन कोटी रुपयांच्यावर गेलं आहे. गावाची वाटचाल सधनतेकडे सुरू झाली आहे. ‘साधारणपणे मार्च ते जुलै-ऑगस्ट या काळात हे पीक घेतले जाते. कारगिलमधील सुमारे वीस गावे आता जर्दाळूचं पीक घेत आहेत. आता शेतकऱ्यांना मार्केटिंगच्या तंत्राबद्दल मार्गदर्शन आणि कच्चे जर्दाळू सुखवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याची गरज आहे. यातून जर्दाळूच्या व्यापारात मोठी वाढ होईल,’अशी अपेक्षा मेहबूब यांनी व्यक्त केली.

कारगिलची अर्थव्यवस्था खुबानीमुळं बहरली आहे. या वर्षी ३५ टन जर्दाळू आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये निर्यात झाले. गेल्या दोन वर्षांपासून ही निर्यात होण्यास सुरवात झाली. सरकारने त्यासाठी शेतकऱ्यांना पाठबळ दिले. आता हॉटेलमध्येही लोक विक्रीसाठी जर्दाळू ठेवत आहेत. त्यामुळे पर्यटकांकडून देखील त्याची खरेदी वाढली आहे.

- कादीर अली, जर्दाळू व्यापारी, कारगिल

पंजाब गव्हासाठी ओळखला जातो, तसं कारगिलचं कोणतं पीक नाही. पण येथील मातीत सर्वोत्तम दर्जाची खुबानी पिकविण्याची क्षमता आहे. या पिकाला रास्त भाव आणि चांगली बाजारपेठ मिळावी, त्यासाठी सरकारी स्तरावर प्रयत्न केले, तर खुबानी हीच आंतरराष्ट्रीय स्तरावर कारगिलची ओळख बनेल आणि येथील शेतकरी देखील समृद्ध होईल.

- महंमद यासीन अन्सारी, नागरिक, कारगिल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com