खालिदा झिया यांना सात वर्षांचा तुरुंगवास

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018

ढाका: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया (वय 73) यांना भ्रष्टाचाराच्या दुसऱ्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सात वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

ढाका: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया (वय 73) यांना भ्रष्टाचाराच्या दुसऱ्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सात वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

दिवंगत पती झिआयुर रहमान यांच्या नावाने सुरू केलेल्या अनाथालयाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा दोषारोप त्यांच्यावर आहे. यातील पहिल्या प्रकरणात न्यायालयाने फेब्रुवारी महिन्यात त्यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावलेली आहे. आजची शिक्षा ही झिया चॅरिटेबल ट्रस्टमधील भ्रष्टाचाराशी संबंधित आहे. यानुसार झिया व अन्य तिघांनी अधिकाराचा गैरवापर करीत ट्रस्टसाठी बेनामी स्रोतांकडून तीन लाख 75 हजार अमेरिकी डॉलर जमा केल्याचा आरोप आहे.

खालिदा झिया या आजारी असल्याचे कारण देत न्यायालयात गैरहजर राहिल्या. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत या खटल्याची अंतिम सुनावणी झाली. न्यायाधीश मोहम्मद अख्तरुझमान यांनी कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम ठेवीत त्यांना सात वर्षांची शिक्षा दिली. तसेच त्यांच्या अनुपस्थितीत सुनावणी होऊ नये, ही झिया यांची याचिका फेटाळून लावली. झिया यांचे माजी राजकीय कामकाज सचिव हॅरिस चौधरी, त्यांचे माजी सहकारी झिआउल इस्लाम मुन्ना व ढाक्‍याचे माजी महापौर सादिक होसैन खोका यांनाही न्यायालयाने दोषी ठरविले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: khaleda zia gets seven years in jail