कुलभूषण जाधव हे भारतीय हेर: "फ्रंटलाईन'च्या लेखाची पाकिस्तानमध्ये दखल

शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

कराची - पाकिस्तानी सैन्याने हेरगिरीच्या आरोपांतर्गत बेकायदेशीररित्या अटक केलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा देण्यात येऊ नये, असा स्पष्ट निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिला आहे. जाधव हे भारतीय हेर असल्याचा पाकिस्तानचा आरोप भारताकडून स्पष्ट शब्दांत फेटाळून लावण्यात आला आहे. या प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकालही भारताच्या बाजुने लागल्याने पाकिस्तानची जागतिक पातळीवर नाचक्की झाली होती. परंतु, "फ्रंटलाईन' या डाव्या विचारसरणीकडे झुकणाऱ्या एका प्रसिद्ध भारतीय प्रकाशनाने नुकताच एक लेख प्रकाशित केला आहे. प्रवीण स्वामी या तज्ज्ञाने लिहिलेल्या या लेखामध्ये जाधव हे अजूनही भारतीय नौदलाचे अधिकारी असल्याची "शक्‍यता' वर्तविण्यात आली आहे. स्वामी यांनी वर्तविलेली ही शक्‍यता भारताच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयातील भूमिकेस छेद देणारी आहे. या लेखाचे पडसादही तत्काळ उमटले असून "डॉन' या पाकिस्तानमधील महत्त्वपूर्ण वृत्तपत्राने तत्काळ याची दखल घेतली आहे.

""भारताने पाकिस्तानविरोधात अघोषित युद्ध सुरु केले आहे आणि हेरगिरीचा आरोप सिद्ध झालेले भारतीय हेर कुलभूषण जाधव हे भारतीय नौदलाचे अधिकारी आहेत, ही बातमी आता पाकिस्तानमधील नागरिकांसाठी नवी राहिलेली नाही. मात्र भारतामधील एका प्रतिष्ठित भारतीय मासिकाने ही बाब मान्य करणे, ही नक्कीच मोठी बातमी आहे. "दी हिंदु' या भारतामधील प्रसिद्ध वृत्तपत्राच्या प्रकाशकांकडून प्रकाशित केल्या जाणाऱ्या फ्रंटलाईन या मासिकाने केवळ भारत पाकिस्तानविरोधात छुपे युद्ध करत असल्याचे मान्य केले आहे, असे नव्हे; तर जाधव यांच्या अटकेनंतर पाकिस्तानकडून त्यांना करण्यात आलेल्या शासनानंतर भारताने आपल्या धोरणाचा पुनर्विचार करावा, असेही म्हटले आहे,'' असे डॉनमधील यासंदर्भातील लेखात म्हटले आहे.

स्वामी यांच्या लेखाचा गोषवारा -
""जाधव हे कोण आहेत, ते त्या भागात कसे गेले, का गेले या प्रश्‍नांची उत्तरे मिळत नाहीत. यासंदर्भातील सर्व सरकारी कागदपत्रे "सील' करण्यात आली आहेत. या प्रश्‍नांची व्याप्ती जाधव यांच्या दैवापेक्षा कितीतरी मोठी आहे. या प्रकरणापलीकडे एक गुप्त युद्ध दडलेले आहे ज्यामध्ये शेकडो, हजारो प्राणाहुती पडण्याची शक्‍यता आहे. 2003 पासून भारताने जिहादी आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या आयएसआयला रोखण्याकरिता पाकिस्तानविरोधात गुप्त कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले होते. आता "रॉ' कडून राबविण्यात आलेल्या या मोहिमेने लष्करे तैयबा आणि जैश-इ-मोहम्मद या दहशतवादी संघटनांविरोधात मोठे यश मिळविले होते. मात्र जाधव यांच्या उदाहरणावरुन हे युद्ध धोकादायक असल्याचेच स्पष्ट झाले आहे.
तत्त्वत:, जाधव हे अजूनही भारतीय नौदलाचे अधिकारी असल्याच्या दाव्याची सत्यता सिद्ध करण्यासाठी फारसे प्रयत्न करण्याची आवश्‍यकता नाही. गॅझेट ऑफ इंडियामध्ये भारतीय लष्कर व नागरी सेवांमधील अधिकाऱ्यांच्या नेमणुका, बढत्या आणि निवृत्तीसंदर्भातील माहिती नोंदविलेली असते. 1987 मध्ये नौदलात दाखल झालेल्या जाधव यांचा सेवा क्रमांक 41558 झेड असा होता. या नोंदींनुसार 13 वर्षांच्या सेवेनंतर जाधव यांना 2000 मध्ये कमांडरपदी बढती मिळावयास होती. मात्र गॅझेट ऑफ इंडियामधून 2000 मधील काही महिन्यांतील संरक्षण मंत्रालयाशी संबंधित असलेली सर्व माहिती हटविण्यात आली आहे. त्यानंतरच्या फाईल्समध्ये जाधव यांच्या निवृत्तीसंदर्भातील कोणतीही माहिती नाही. अर्थात हे गॅझेट "माहिती वगळणे वा चुका असणे,' यांपासून सुरक्षित नाही. भारतातील सरकारने आंतरराष्ट्रीय न्यायालयास जाधव हे नौदलाचे निवृत्त अधिकारी असल्याचे सांगितले आहे. मात्र ते नेमके कधी निवृत्त झाले हे भारताने सांगितलेले नाही''.

याशिवाय या लेखामध्ये जाधव यांच्या इराणपर्यंत झालेला प्रवास, भारतीय नौदलाला पाकिस्तानी दहशतवाद्यांची वाटत असलेली चिंता, "आयबी' व "रॉ'च्या पाकिस्तानविरोधातील मोहिमा, जाधव यांची करण्यात आलेली "निवड', त्यांना करण्यात आलेले अर्थसहाय्य, जाधव यांचे कराचीमधील बलुच नेत्याशी असलेले संबंध, पाकिस्तानकडून यासंदर्भात करण्यात आलेली कारवाई अशा विविध घटकांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. जाधव यांना विविध नावांनी देण्यात आलेल्या पासपोर्टसंदर्भातील माहितीही स्वामी यांनी दिली आहे.

स्वामी यांनी लिहिलेल्या या लेखाचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहेच. डॉनने तत्काळ या लेखाचा दाखला देत जाधव हे भारतीय हेरच असल्याचे भारतीय माध्यमांनी अंतिमत: मान्य केल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानमधील सरकारकडूनही जागतिक पातळीवर या लेखाचा दाखला देत भारताचा खोटेपणा उघड झाल्याची ओरड केली जाण्याची शक्‍यताही वर्तविण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kulbhushan jadhav pakistan india espionage