
भूकंपात ३४ जणांचा मृत्यू झाला असून त्याचवेळी ६०० हून अधिक जखमी झाले आहेत. हा भूकंप स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी पहाटे २.१८ वाजता झाला आणि त्याचा केंद्रबिंदू मामूजू सागरपासून सहा किलोमीटर अंतरावर होता.
जकार्ता - इंडोनेशियाला शुक्रवारी भूकंपाचा तीव्र धक्का बसला. पश्चिम सुलावेसी प्रांतात झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.२ इतकी होती. या भूकंपात ३४ जणांचा मृत्यू झाला असून त्याचवेळी ६०० हून अधिक जखमी झाले आहेत. हा भूकंप स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी पहाटे २.१८ वाजता झाला आणि त्याचा केंद्रबिंदू मामूजू सागरपासून सहा किलोमीटर अंतरावर होता.
इंडोनेशियाची वृत्तसंस्था बीएनपीबीनुसार या शक्तीशाली भूकंपामुळे गर्व्हनर कार्यालय, हॉटेल, अनेक बंगले, आरोग्य केंद्राचे नुकसान झाले आहे. एक हॉटेल तर संपूर्णपणे कोसळल्याचे बचाव पथकातील अधिकाऱ्याने म्हटले आहे. पडझड झालेल्या घराखाली अनेकजण अडकल्याचे बचाव पथकातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. भूकंपानंतर सुमारे हजारो नागरिकांनी घर सोडले असून त्यांना अन्य सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. तसेच अनेक भागातील वीज गुल झाली असून टेलिफोन नेटवर्कला देखील बरेच नुकसान सहन करावे लागले आहे. याशिवाय रस्त्याला भेगा पडल्या आहेत. इंडोनेशिया सरकारने दिलेल्या निवेदनात भूकंपात ३४ जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. तसेच ६०० हून अधिक जखमी झाले असून त्याच्या मदतीसाठी हेलिकॉप्टर पाठवण्यात आल्याचे म्हटले आहे.सुलावेसी येथे आलेल्या भूकंपामुळे चार जिल्ह्यात भूस्खलन झाले. त्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना संपूर्ण रात्र घराबाहेर काढावी लागली. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनने प्रसारित केलेल्या एका व्हिडिओत एक मुलगी मदत मागत असल्याचे दिसते.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक मंत्र्यांना, सैनिक प्रमुखांना, पोलिसांना आणि आपत्ती व्यवस्थापनातील संस्थांना तातडीने घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले आहेत. भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांच्या दु:खात इंडोनेशिया सरकार आणि देशातील नागरिक सहभागी आहेत.
- जोको विडोडो, अध्यक्ष, इंडोनेशिया