व्हॉट्सअॅपवर कर लावल्याने पंतप्रधानांना व्हावे लागले पायउतार

वृत्तसंस्था
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

दिवसाला 14 रुपये द्यावे लागणार

- अर्थसंकल्पासाठी कर्ज

बेरुत : आर्थिक मंदीत सापडलेल्या लेबनान सरकारने सोशल मीडियावरील फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप फीचर्सवर कर लावण्यास सुरवात केली. सरकारच्या या निर्णयानंतर जनतेकडून प्रचंड रोष व्यक्त केला जात होता. या रोषानंतर अखेर लेबनानचे पंतप्रधान साद हरीरी यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. 

सध्याच्या डिजिटलच्या युगात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. यातच व्हॉट्सअॅपच्या वापराचे प्रमाणही मोठे आहे. अशातच आर्थिक मंदीत सापडलेल्या लेबनान सरकारकडून विशेष पावले उचलली जात होती. सरकारने ऑक्टोबरपासून व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक मेसेंजरवरील मेसेज आणि कॉलवर कर लावण्याची घोषणा केली होती. यानंतर देशात ठिकठिकाणी सरकारविरोधात निदर्शने करून निषेध व्यक्त केला जात होता. जनतेच्या या प्रचंड रोषामुळे पंतप्रधान हरीरी यांनी राजीनामा द्यावा लागला. 

देशाची अर्थव्यवस्था बिघडली : हरीरी

सध्या देशाची अर्थव्यवस्था बिघडली आहे. बिघडलेली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी पुढे यावे, असे आवाहन साद हरीरी यांनी केले. तसेच देश आर्थिक संकटात आहे. या करामुळे उत्पन्नात वाढ होईल.

दिवसाला 14 रुपये द्यावे लागणार

फेसबुक मेसेंजर, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून कॉल करणाऱ्या ग्राहकाला दिवसाला 0.20 डॉलर म्हणजे 14 रुपये द्यावे लागणार होते. यामुळेच या निर्णयाविरोधात नागरिकांनी ठिकठिकाणी निदर्शने सुरू केली.

अर्थसंकल्पासाठी कर्ज

लेबनान सरकराची आर्थिक स्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे सरकारला अर्थसंकल्पासाठी कर्ज घ्यावे लागत आहे. या कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी सरकारने फेसबुक मेसेंजर आणि व्हॉट्सअ‍ॅप व्हाईल कॉलिंगवर कर आकारण्यास सुरवात केली होती. मात्र, जनतेच्या तीव्र विरोधानंतर अखेर सरकारला हा निर्णय रद्द करावा लागला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lebanese PM Saad Hariri resigned after Protest