Beirut Blasts: नागरिकांच्या रोषासमोर अखेर सरकार झुकले

कार्तिक पुजारी
Tuesday, 11 August 2020

लेबनॉनची राजधानी बैरुतमध्ये गेल्या आठवड्यात भीषण स्फोट झाला होता. यानंतर येथील नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.

बैरुत (bairut)- लेबनॉनची (Lebanon) राजधानी बैरुतमध्ये गेल्या आठवड्यात भीषण स्फोट झाला होता. यानंतर येथील नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. स्फोटासाठी नागरिकांनी सरकारच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरलंय. हजारो नागरिक रस्त्यावर उतरत त्यांनी सरकारचा राजीनामा मागितला होता. या पार्श्वभूमीवर लेबनॉन सरकारने अखेर राजीनामा दिला आहे. पंतप्रधान हसन दियाब यांनी आपण राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं आहे. 

रक्ताळलेले कपडे आणि त्यात गुंडाळलेला चिमुकला जीव; बैरूत स्फोटानंतरचा फोटो...

बैरुत बंदरातील गोदामामध्ये गेल्या सहा वर्षांपासून 2750 टन अमोनियम नायट्रेट स्फोटकांचा साठा पडून होता. मागील आठवड्यात अनपेक्षितपणे या स्फोटकांना आग लागली. यानंतर झालेल्या दोन स्फोटामध्ये 160 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर सहा हजारांपेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. शिवाय अनेक लोक बेपत्ता असल्याचं कळत आहे. हा स्फोट इतका भयंकर होता की 240 किलोमीटर दूर असणाऱ्या सायप्रसपर्यंत याचा ध्वनी ऐकायला आला होता.

स्फोटाच्या घटनेनंतर लेबनॉन नागरिक प्रचंड संतापले आहेत. त्यांनी रस्त्यावर उतरुन निदर्शने सुरु केले. अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले. सध्याचे सरकार भ्रष्टाचारी आणि गुन्हेगार आहे. त्यामुळे सरकारला सत्तेत राहण्याचा काहीही अधिकार नाही, असं म्हणत आंदोलकांनी सरकारमधील प्रत्येकाचा राजीनामा मागितला होता. मागील वर्षी ऑक्टोबरमध्येही नागरिकांनी सरकारविरोधात आंदोलन केले होते. मात्र, यावेळचे आंदोलन वेगळे आहे. लोकांमध्ये प्रचंड राग आहे. 'राजीनामा द्या किंवा गळफास घ्या' अशी कठोर भूमिका नागरिकांनी घेतली होती.

IAS ते राजकारण; स्वत:चा पक्ष स्थापन करणाऱ्या शाह फैझल यांचा आणखी एक धक्का

सरकारने आंदोलन चिरडण्यासाठी सैन्य आणि पोलिसांना तैनात केले होते. यावेळी झालेल्या झडपेत अनेक आंदोलक जखमी झाले. कोरोना उद्रेक सुरु असताना आंदोलकांना दाखल करण्यासाठी हॉस्पिटल कमी पडत आहेत. आंदोलकांचा वाढता रोष पाहता सरकामधील अनेक मंत्र्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली होती. अखेर पंतप्रधान दियाब यांनीही राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं.

बैरुतमधील स्फोटामुळे अनेकांना हिरोशीमावरील आण्विक हल्ल्याची आठवण झाली. बैरुतमधील स्फोट हिरोशीमावरील हल्ल्याच्या एक दंशाश (१/10) तीव्रेतचा होता असं तज्ज्ञाचं मत आहे. शिवाय आण्विक स्फोट सोडून हा इतिहासातील सर्वात मोठा स्फोट असल्याचं सांगण्यात येत आहे. या हल्ल्यामागे काही घातपात आहे का, याचाही तपास केला जात आहे. आंदोलकांनी या स्फोटाची फॉरेन एजेंसीकडून तपासाची मागणी केली आहे. मात्र, सरकारने ही मागणी फेटाळली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lebanon PM Announces Resignation Of Government Over Deadly Beirut Blasts