नीरव मोदीची कंपनी विकत घेण्यासाठी गुंतवणूकदार उत्सुक 

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 मार्च 2018

नवी दिल्ली : भारतात पंजाब नॅशनल बँकेचे कर्ज बुडवून परदेशात पळ काढलेला हिरे व्यावसायिक नीरव मोदी याची अमेरिकेतील कंपनी विकत घेण्यासाठी संभाव्य खरेदीदारांनी उत्सुकता दर्शविली आहे. 'फायरस्टार डायमंड' या मोदीच्या कंपनीने 26 फेब्रुवारी रोजी अमेरिकेत दिवाळखोरीचा अर्ज दाखल केला. 

नवी दिल्ली : भारतात पंजाब नॅशनल बँकेचे कर्ज बुडवून परदेशात पळ काढलेला हिरे व्यावसायिक नीरव मोदी याची अमेरिकेतील कंपनी विकत घेण्यासाठी संभाव्य खरेदीदारांनी उत्सुकता दर्शविली आहे. 'फायरस्टार डायमंड' या मोदीच्या कंपनीने 26 फेब्रुवारी रोजी अमेरिकेत दिवाळखोरीचा अर्ज दाखल केला. 

भारतात 11 हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार करून नीरव मोदी आणि त्याचा व्यावसायिक भागीदार मेहुल चोक्‍सी हे दोघे जानेवारीमध्येच देशातून बाहेर गेले. त्यानंतर हा गैरव्यवहार उघडकीस आला. त्यांच्याविरोधात कारवाई सुरू झाल्यानंतर दोघांनीही 'आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही' अशी भूमिका घेतली आहे. पण नीरव मोदीच्या बहुतांश मालमत्तांवर भारतामध्ये जप्तीची कारवाई झाली आहे. भारतात दाखल झालेल्या तक्रारीमध्ये 'फायरस्टार डायमंड'चा उल्लेख नाही. 'ही कंपनी विकत घेण्यासाठी अनेक खरेदीदारांनी ठोस इच्छा व्यक्त केली आहे', असे 'फायरस्टार डायमंड'ने अमेरिकी न्यायालयासमोर सादर केलेल्या अर्जामध्ये म्हटले आहे. 'फायस्टार'ची वार्षिक उलाढाल 5.9 अब्ज रुपयांपर्यंत आहे. 

या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने पंजाब नॅशनल बँकेचे सात कर्मचारी आणि मोदी-चोक्‍सी यांच्या कंपनीतील सहा कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. याशिवाय, मोदी आणि चोक्‍सी यांच्या मालमत्ताही जप्त झाल्या आहेत. 

'या प्रकरणी भारतातील संबंधित कंपन्या बंद करण्यात आल्या आहेत. 'फायरस्टार'चे बहुतांश उत्पादन या कंपन्यांमधून होत असे; शिवाय भारतातील कंपन्यांमधून 'फायरस्टार'चे कार्यालयीन कामकाजही होत असे. आता ही कार्यालये अचानक बंद झाल्यामुळे 'फायरस्टार'च्या दैनंदिन कामकाजावर आणि व्यवसायावर प्रचंड परिणाम झाला आहे', असेही 'फायरस्टार'ने अर्जात नमूद केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nirav modi CBI Punjab Natioanl Bank