डोनाल्ड ट्रम्पना आता बहिणीकडून ‘आहेर’

वृत्तसंस्था
Monday, 24 August 2020

मेरी यांनी ट्रम्प यांच्याविषयी एक पुस्तक लिहिले असून त्यांचे वर्तन बेदरकार आणि वादग्रस्त असल्याचे म्हटले आहे. त्यांच्याशी बोलताना मेरीअॅन यांनी डोनाल्ड यांच्या स्थलांतरविषयक धोरणावर टीका केली.

वॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आता बहिणीकडून आहेर मिळाला आहे. डोनाल्ड हे क्रूर आणि खोटारडे असल्याचे मेरीअॅन ट्रम्प बॅरी यांनी म्हटल्याचे उघड झाले आहे.

डोनाल्ड यांची पुतणी मेरी हिने मेरीअॅन यांच्या बोलण्याचे गुप्तपणे ध्वनिमुद्रण केले होते. त्या ध्वनीफिती वॉशिंग्टन पोस्ट या दैनिकाने मिळविल्या आणि वृत्त दिले.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मेरी यांनी ट्रम्प यांच्याविषयी एक पुस्तक लिहिले असून त्यांचे वर्तन बेदरकार आणि वादग्रस्त असल्याचे म्हटले आहे. त्यांच्याशी बोलताना मेरीअॅन यांनी डोनाल्ड यांच्या स्थलांतरविषयक धोरणावर टीका केली. त्यामुळे सीमेवर पालकांशी हजारो मूलांची ताटातूट झाली असून त्यांना डांबून ठेवण्यासाठी उघडलेल्या केंद्रांमध्ये पाठविले जात आहे. डोनाल्ड हे क्रूर आणि खोटारडे असून त्यांच्याकडे तत्त्वांचा अभाव असल्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही. त्यांना केवळ आपल्या मतदारांशी देणेघेणे आहे. त्यांच्या धिक्कारण्यात आलेल्या ट्विट आणि खोटारडेपणा यावर तर विश्वासच बसत नाही. वचनभंगामुळे दुखावलेला सहकारी,  उद्योगपती यांच्यापैकी कुणी नव्हे तर  जवळच्या नात्यातील व्यक्तीने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अशी टीका केली आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

डमीचा संदर्भ
पेनसिल्वानिया विद्यापीठाची प्रवेश परीक्षा देण्यासाठी डोनाल्ड यांनी एका सहकारी विद्यार्थ्याला रक्कम दिली होती असा मेरी यांच्या पुस्तकातील खळबळजनक उल्लेखाचा संदर्भही या बोलण्यात आला आहे. त्या डमी विद्यार्थ्याचे नावही आपल्याला आठवत असल्याचा दावा मेरीअॅन करतात. या संभाषणात एका टप्प्यास त्या म्हणतात की, हा खोटारडेपणाचा कळस आहे. ते असे ढोंगीपणा करतात आणि त्यांचा स्वभाव असाच क्रूर आहे.

ट्रम्प उत्तरले ः कुणाला फिकीर आहे
अॅटर्नी तसेच निवृत्त न्यायाधीश असलेली 83 वर्षीय बहीण मेरीअॅन यांचे वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या खास शैलीत फेटाळून लावले. ते म्हणाले की, दररोज (माझ्यावर टीका करणारे) काहीतरी वेगळे (ऐकायलाः येत असते, पण कुणाला फिकीर आहे ? मला माझ्या भावाची उणीव जाणवते. मी अणेरिकी जनतेसाठी कसून परिश्रम करीत राहीन. प्रत्येक जणाला हे पटते असे नाही, पण निकाल स्वाभाविक आहे. आपला देश लवकरच पूर्वीपेक्षा आणखी बलाढ्य होईल, असेही ट्रम्प यांनी नमूद केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marian Trump Barry said Donald is cruel and a liar on leaked audio recordings