
Mark Zuckerberg : ...जमत नसेल तर नोकरी सोडा; मार्कचं कर्मचाऱ्यांना धमकावणारं जुनं पत्र लीक
मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्गचा एक जुना ई-मेल आता लीक झाला आहे. यामध्ये झुकरबर्गने एका कर्मचाऱ्याला राजीनामा द्यायला सांगितलं आहे. २२ सप्टेंबर २०१० च्या पत्रानुसार, एका कर्मचाऱ्याने टेकक्रंच या न्यूज पोर्टलला फेसबुक स्मार्टफोनबद्दल सांगितल्यानंतर झुकरबर्ग नाराज झाला होता.
ही माहिती चुकीची असून त्यामुळे कंपनीचे नुकसान झाले आणि म्हणून त्यांनी कर्मचाऱ्याला राजीनामा देण्यास सांगितलं. हे पत्र गोपनीय आहे, शेअर करू नका, अशी या ईमेलची सुरुवात आहे. तर गोपनीयता राखू शकत नसाल तर नोकरी सोडा, असं या मेलमध्ये शेवटी लिहिलं आहे.
इंटर्नल टेक इमेल्स या ट्वीटर अकाऊंटने हे पत्र जाहीर केलं आहे. यामध्ये लिहिलं आहे की, "आम्ही मोबाईल फोन बनवत आहोत असा दावा करणारी TechCrunch ची स्टोरी तुमच्यापैकी अनेकांनी ऐकली आहे. आपण फोन बनवत नाही आणि मी याबद्दल प्रश्नोत्तरांच्या वेळी सांगितलं होतं की आपण प्रत्यक्षात काय करत आहोत. ही माहिती बाहेर आली आहे."
"म्हणून मी ज्या कोणी हे लीक केले आहे त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा असे सांगत आहे. जर तुम्हाला वाटत असेल की अंतर्गत माहिती लीक करणे कधीही योग्य आहे, तर तुम्ही काम सोडा. तुम्ही तसे करत नसल्यास राजीनामा द्या, तरीही तुम्ही कोण आहात हे आम्ही नक्कीच शोधू."