खनिज तेल भडकले ; भावात एक टक्का वाढ

रॉयटर्स
शनिवार, 23 जून 2018

"ओपेक'ने 2017 मध्ये खनिज तेलाचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. या वर्षात खनिज तेलाची मागणी वाढल्याने भावानेही उच्चांक गाठला होता. यामुळे खनिज तेल आयातीवर अवलंबून असलेल्या देशांचे कंबरडे मोडले होते.

सिंगापूर : "ओपेक'च्या बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर खनिज तेलाच्या भावात शुक्रवारी एक टक्का वाढ झाली. या बैठकीमध्ये खनिज तेल उत्पादनात वाढ करण्याचा निर्णय होण्याबाबत साशंकता निर्माण झाल्याने ही भाववाढ झाली आहे. 

जागतिक पातळीवर खनिज तेलाचा भाव आज प्रतिबॅरल 74.02 डॉलरवर गेला. कालच्या तुलनेत भावात 1.3 टक्का वाढ झाली. तेल उत्पादक देशांची संघटना "ओपेक'ची बैठक आज व्हिएन्नामध्ये उशिरा होत आहे. या बैठकीत खनिज तेलाचे उत्पादन वाढविण्याबाबत चर्चा होणार आहे. खनिज तेलाचे उत्पादन वाढवावे यासाठी सौदी अरेबियाने पुढाकार घेतला आहे. या बैठकीत "ओपेक' सदस्य देशांसोबत खनिज तेल उत्पादनात आघाडीवर असलेला रशियाही सहभागी होणार आहे. 

"ओपेक'ने 2017 मध्ये खनिज तेलाचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. या वर्षात खनिज तेलाची मागणी वाढल्याने भावानेही उच्चांक गाठला होता. यामुळे खनिज तेल आयातीवर अवलंबून असलेल्या देशांचे कंबरडे मोडले होते.

या देशांमध्ये इंधनाचे दर भडकले होते. यामुळे या ग्राहक देशांकडून खनिज तेल उत्पादन वाढविण्याची मागणी "ओपेक'कडे होत होती. सौदी अरेबिया आणि रशिया उत्पादन वाढविण्याच्या बाजूने आहेत. याला इराणसह अन्य काही ओपेक सदस्य देशांचा विरोध आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mineral oil stirred One percent increase in prices